पुणे – प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता…, ‘त्या तिघी’ या कादंबरीवरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम, युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ हा भारावून टाकणारा कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ हा सांगीतिक कार्यक्रम यांमधून सावरकरांचे चरित्र उपस्थितांसमोर उलगडले. निमित्त होते पंडित फार्म्स येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘तू सूर्याचे तेज’ या विशेष कार्यक्रमाचे.
पुण्यातील कोटीभास्कर गृपचे चिदंबर कोटीभास्कर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर अजय धोंगडे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते. सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीपाद खुर्जेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु सुचेता भिडे चापेकर, जनकल्याण समितीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक डंबिर, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं आनंद भाटे, कवी वैभव जोशी आणि निस्सीम सावरकर प्रेमी जयराम नारगोलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रविवारी सकाळी प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांच्या ‘सावरकरांची अंदमानातील कविता’ हा कार्यक्रमाने उपक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये धनश्री लेले यांनी सावरकरांच्या कविता सादर केल्या. यानंतर दुपारी १२ वाजता ‘त्या तिघी’ या कादंबरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश प्रस्तुत झाला. यामध्ये आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणाऱ्या सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर, शांताबाई नारायण सावरकर या तीन वीरांगनांची शौर्यकथा उपस्थितांसमोर मांडण्यात आली. सदर एकपात्री नाट्यप्रवेशाची संकल्पना, संहिता लेखन, दिग्दर्शन व सादरीकरण हे अपर्णा चोथे यांचे होते.
यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम प्रस्तुत झाला. पुण्यातील कलासक्त, कलावर्धिनी, निलिमा प्रोडक्शन आणि कलानुभूती या नृत्यसंस्थांनी यावेळी कवितांचे नृत्य सादरीकरण केले तर स्नेहल दामले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कथक व भरतनाट्यम अशा दोन नृत्यशैलींमध्ये या कविता सादर झाल्या. पुढे युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत ‘सावरकरांची लंडन वारी’ हा कार्यक्रम प्रस्तुत केला.
‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ या सांगीतिक कार्यक्रमाने ‘तू सूर्याचे तेज’ या उपक्रमाचा समारोप झाला. सावरकरांच्या कविता, गाणी आणि अभ्यासपूर्ण निवेदन यातून यावेळी सावरकरांचे चरित्र उलगडले गेले. सदर कार्यक्रमाची संकल्पना ही अनघा मोडक यांची होती यावेळी धनंजय म्हसकर, शरयू दाते, नचिकेत देसाई, केतकी भावे जोशी यांनी गायन केले. कार्यक्रमाचे संयोजन व संवादिनी यांची जबाबदारी निरंजन लेले यांची पार पाडली. तर प्रशांत लळीत (संगीत संयोजन व कि बोर्ड), ओंकार देवसकर (कि बोर्ड), निषाद करलगिकर (तबला), हनुमंत रावडे (पखावज, ढोलक), दिगंबर मानकर (तालवाद्य, ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली.