पुणे-समाज सावरण्यासाठी आपआपसातील दुही संपवली पाहिजे, त्यासाठी राष्ट्र निर्माणाचे प्रतिक असणारी राम मंदिर निर्मिती महत्त्वाची असल्याचे मत रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे पंचतीर्थ प्रसार समितीच्या वतीने वीर लहुजी यांचे जन्मस्थान, पेठ, ता. पुरंदर, भिवडी, राऊत या पदवीने सन्मानित साळवे कुटुंबियांचे गाव, गुरुवर्य वीर लहुजींनी गंजपेठेत बांधलेली तालीम, लहुजींचे संगमवाडी येथील समाधीस्थळ आणि वीर लहुजींचे वडील राघोजी साळवे यांची पुणे मुंबई रस्त्यावरील मांगीरबाबांची समाधी या पाच पवित्र ठिकाणच्या मृदेच्या कलशांचे विविधवत पूजन करुन अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीसाठी आचार्य गोविंद देवगिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आचार्य गोविंद देवगिरी मार्गदर्शन करीत होते.
न्यासाचे विश्वस्त माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अशोक लोखंडे, सुरेश पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
आचार्य गोविंद देवगिरी पुढे म्हणाले, ‘राष्ट्र आणि धर्माचे रक्षण हा प्रभूरामचंद्र ते आद्यक्रांतीगुरु लहुजी यांच्यातील समान धारा आहे. देशाच्या कल्याणासाठी जे हवे ते करण्याची दोघांची तयारी होती. हिंदुत्व, संस्कृती, देशप्रेम हा दोघांतील दुवा आहे. समाजाला जागे करण्यासाठी शक्तीची जाणीव आणि आत्मविश्वास जागृत करण्याची आवश्यकता असते. ते कार्य अशाप्रकारच्या कार्यक‘मातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असते.’
दरम्यान, आजपर्यंत राममंदिर निर्मितीसाठी ७८ कोटी रुपयांचा निधीचे संकलन करण्यात आले असून त्यापैकी २४ कोटी रुपये लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीला मंदिर निर्मितीच्या कामसाठी सुपूर्द करण्यात आले आहे.दहा रुपये आणि शंभर रुपयांच्या कूपनांद्वारे १५ जानेवारीपर्यंत मंदिर उभारण्यासाठी आवश्यक निधी उभा करणार असून मंदिराचे काम २०२४ पर्यंत पूर्ण करणार, परंतु कोणतीही घाई न करता गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.