पुणे – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ‘संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार’ हवेली तालुक्यातील नांदोशी या गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीस राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष मारुती उर्फ महेश गायकवाड यांनी स्वीकारला.
याप्रसंगी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वृक्षारोपण व वनसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे एक्कावन हजार रुपये समितीस देण्यात आले आहेत. यावेळी आपले विचार व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले,’मनुष्य जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत लाकडाचे महत्व असून प्रत्येकाने एक वृक्ष लावण्याची गंगा मनामनात जावी कारण लाकडंच मानवाचे जीवन आहे’ .आपले मनोगत व्यक्त करताना समितीचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी संविधानातील मार्गदर्शक तत्वातील 48 अ व 51 अ या कलमांचा उल्लेख करून आपले व राज्याचे मूलभूत कर्तव्य यावर प्रकाश टाकला व संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली वननिती उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय एल पी राव,डॉ. सुनीता सिंग, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,प्रधान सचिव बी वेणूगोपाल रेड्डी आदी मान्यवरांसह राज्यभरातून वनाधिकारी व विविध संस्थांचे अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी चौधरी यांनी केले तर आभार वनसंरक्षक हणमंत धुमाळ यांनी मानले.