केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

महाराष्ट्र लेख
Spread the love

या वर्ष प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे कारण, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष शतकी वयाची वाढ नोंदवत आहे. नागपूरच्या सरदार मोहित्यांच्या पडक्या वाड्यात विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. किशोर वयाच्या दहा-बारा मुलांना समवेत घेऊन सुरू झालेला संघ आज देशात पण ५५ हजार शाखा व जगभरातील सुमारे ६० देशांमध्ये कार्य करीत आहे. जवळजवळ ४० विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघसृष्टीतल्या संघटनांसह एक लाख पंचवीस हजार सेवाकार्य देशभरात सुरू आहेत. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अर्थकारण, समाजकारण, राजकारणाला दिशा देण्याची क्षमता सिद्ध केलेले स्वयंसेवक समाजाचे नेतृत्व करीत आहेत. संपूर्ण जग ‘कोरोना’सारख्या भीषण संकटाचा सामना करीत असताना देश-विदेशात स्वयंसेवकांनी मानवतेची केलेली सेवा ‘हिंदुत्वा’ची पताका जगभर फडकवीत आहे.

‘हिंदुत्व म्हणजे विश्वबंधुत्व’ या विश्वाला गवसणी घालणाऱ्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण जग अनुभवत आहे. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याचे व्रत आजन्म पाळण्याची प्रतिज्ञा केलेले लाखो स्वयंसेवक परमपूजनीय डॉक्टरांनी दाखविलेल्या ‘संघ शाखा’ मार्गानुसार  मार्गक्रमण करीत आहेत. मातृभूला परमवैभवाला नेण्याचे स्वप्न उराशी बाळगत आपल्या आयुष्याचे ‘हवन’ करणाऱ्या स्वयंसेवकांच्या तपश्चर्येला फळ येत असल्याचे दिसत आहे.

दूर जरी ध्येयाचे मंदिर, कळस दिसू लागले

भगीरथाने उग्रवताने स्वरगंगा आणली

गंगोघापरी संघ धार या भूमीवर पातली

अगणित भगीरथांचे यास्तव अविरत व्रत चालले

नागपूरला सन १९२५ ला प्रकट झालेली ‘संघ गंगा’ डॉक्टर हेडगेवार नावाच्या भगीरथाच्या अविरत तपश्चर्येचे फलित आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी किशोरवयीन मुलांना घेऊन हिंदुराष्ट्र निर्मितीचे ‘यज्ञकुंड’ चेतवणारे डॉक्टर हेडगेवार वैद्यकीय शिक्षण कलकत्त्याला पूर्ण करून नागपुरात आले ते आजन्म अविवाहित राहून देशसेवा करण्याचा निर्धार करूनच! सध्याच्या तेलंगण राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात असलेले कंदकृती हे मूळ गाव असलेले हेडगेवार घराणे पौरोहित्यासाठी सन १८०० मध्ये नागपुरात आले. अग्निहोत्राचे व्रत आचरणाऱ्या बळीरामपंत व रेवतीबाई या दाम्पत्याच्या तीन मुले व तीन मुलींपैकी  केशवराव धाकटे. वयाच्या बाराव्या वर्षी एकाच दिवशी प्लेगच्या साथीत मातृ-पितृ छत्र हरवले. बलदंड प्रकृतीच्या वडिलबंधू महादेव शास्त्रींनी केशवाला सांभाळले. मल्लखांब, कुस्ती शिकवली. पौरोहित्य अथवा कर्मकांडाबाबत प्रथमपासूनच उदासीन असणाऱ्या केशवरावांनी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासात प्रावीण्य मिळविले होते. जन्मजात देशभक्त असणाऱ्या केशवाने नागपूर किल्ल्यावरचा युनियन जॅक उतरवण्यासाठी घरापासूनच भुयार खणायला प्रारंभ केला होता. त्यांच्या उग्र स्वभावाचा प्रसाद कलकत्त्याला वैद्यकीय शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळकांविषयी वाईट उद्गार काढणाऱ्या एका वक्त्याला भर सभेत गालफाडात मारून त्यांनी दिला होता. कलकत्त्याच्या वास्तव्यात सशस्त्र क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीच्या कार्यात डॉक्टर सामील होते. नागपूरला परतल्यावरही काँग्रेसच्या वेगवेगळ्या चळवळीत ते सहभागी होते. सन १९२१ च्या असहकार आंदोलनात त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. हा खटला त्यांनी स्वतःच लढवला होता. तुरुंगात डॉक्टरांनी प्रचंड चिंतन केले. आपला देश गुलाम का झाला? सर्व प्रकारचे वैभव नष्ट होऊन हिंदू समाजाचे भाळी पारतंत्र्य, दुःख, दैन्य का आले? सतत स्वातंत्र्याचे चिंतन करणाऱ्या डॉक्टरांनी लोकमान्य टिळकांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध योजनांवर चर्चा केली होती. नागपुरातल्या डॉक्टर मुंजे यांच्यासारख्या गणमान्य व्यक्तींशीही त्यांचा स्नेह होता.

एकूण चर्चा-विमर्शानंतर डॉक्टर एका निष्कर्षाला आले की, “हिंदू समाज केवळ आत्मविस्मृत झाला एवढेच नव्हे तर विस्कळीत, असंख्य भेदाभेदांनी पोखरलेला आणि म्हणून पराभूत मानसिकतेत गेलेला आहे.” या राष्ट्राचा मूलाधार असलेल्या पुत्रवत हिंदू समाजाला संघटित करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. व्यक्ती-व्यक्तीच्या मनात हिंदुत्वाच्या विचारांचे जागरण करून संघटित, बलसंपन्न, स्वाभिमानी संघटना हेच त्याचे साधन होऊ शकते. म्हणून, अनेकांशी विचारविमर्श करून नागपुरात सन १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी संघाची त्यांनी स्थापना केली. मातृभूमीसाठी सर्वार्थाने समर्पित व्यक्ती निर्माणाची गंगा प्रवाहित झाली!!

रा. स्व. संघ संपूर्ण देशात पसरवण्यासाठी दैनंदिन शाखा हे अद्भुत रसायन, साधन डॉक्टरांनी स्वयंसेवकांच्या हाती दिले. देशाचा विचार हा प्रसंगोपात करण्याचा विषय नसून अखंडपणे व स्वाभाविकपणे कृतीत आणण्याची प्रक्रिया त्यांनी शोधून काढली. सामान्य माणसाच्या आवाक्यात देशभक्ती आणली. काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या डॉक्टरांनी १९३० च्या जंगल सत्याग्रहात आपल्याकडील सरसंघचालक पद श्री. परांजपे यांचेकडे सोपवून सहभाग घेतला, तुरुंगवास भोगला. काँग्रेसच्या युवा विभागाचे नेतृत्वही केले. एवढेच नव्हे तर १९३० च्या ‘संपूर्ण स्वातंत्र्या’च्या काँग्रेसच्या ठरावाला पाठिंबा म्हणून देशातल्या सर्व शाखांवर अभिनंदनाचा कार्यक्रम करण्याचे निर्देश दिले. दि. २६ जानेवारी १९३० हा दिवस काँग्रेसच्या ठरावाप्रमाणे देशभर स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचा आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला. सहकाऱ्यांची मने जिंकण्याची, माणसे पारखण्याची अद्भुत किमया त्यांना साधली होती. सुरवातीपासून शाखेतले कुशपथक तर डॉक्टर सांगतील त्या ठिकाणी देशात सर्व दूर संघ प्रचारासाठी गेल्याचे दिसते. दि. १३ मार्च १९३९ रोजी लाहोरच्या श्री. धर्मवीर जींना लिहिलेल्या पत्रात डॉ. हेडगेवार म्हणतात, “संघाचे कार्य आरंभ करण्यासाठी श्री. बापूराव भिशीकर कराचीला गेले असून, श्री. दादाराव परमार्थ व श्री. चिंचाळकर मद्रासला गेले आहेत. श्री. माधवराव गोळवलकर व श्री. विठ्ठलराव पत्की कलकत्त्याला तर मुंबईला काम करत असलेले श्री. गोपाळराव एरकुंटवार यांची योजना वॉल्टर, आंध्र प्रदेश येथे केली आहे. श्री. आपटे बिहार प्रांतात पुन्हा जाणार आहेत.” अशाप्रकारे देशभर संघ कार्याची योजना करतानाच डॉ. हेडगेवार स्वतः अखंड प्रवास करीत. बैठका, शाखा, उत्सव, संघ शिक्षा वर्ग म्हणजे ‘ओटीसी’, वैयक्तिक भेटी-गाठी, कार्यकर्त्यांची नियुक्ती इत्यादी कामे पार पाडीत. हिंदुराष्ट्रासाठी डॉक्टरांनी विश्रांत अविश्रांत परिश्रम केले. ‘अविरत श्रमणे संघ जिणे’ चा मूर्तिमंत आदर्श स्वयंसेवकासमोर उभा केला. कार्यकर्त्यांच्या योगक्षेमाची काळजी घेत त्यांच्यातला संपूर्ण समर्पणाचा उत्साह डॉक्टर द्विगुणित करीत असत. डॉक्टरांच्या सहवासात आला तरूण संघाला सर्वस्व समर्पण करीत असे. परमपूजनीय गुरुजींसारखे प्रचंड विद्वत्ता, बुद्धिमत्तेचे धनी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणते, “मी डॉक्टरांना तन-मन व आत्माही समर्पित केला आहे.” डॉक्टर रूढ अर्थाने अध्यात्मिक नव्हते , अत्यंत सामान्य परिस्थितीतल्या वैदिक घराण्यातले डॉक्टर संघटन शास्त्राचे मात्र दधीची ठरले.

तत्कालीन सर्व कार्यात संघाचे स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय प्रतिज्ञांमध्ये प्रतिबिंबित होत असे. जगातल्या कोणत्याही निर्बल मानव समूहाला संघटनेशिवाय पर्याय नाही अशी त्यांची धारणा होती. मुस्लिम प्रश्नावर सुद्धा त्यांचे उत्तर एकच – संघ शाखेवर उपस्थिती वाढवा. जळगावच्या १९३७-३८ च्या प्रवासात मुस्लिम दंग्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी बैठकीत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना मुस्लिमांवर हल्ला करून प्रश्न सुटणार नाही तर हिंदूंचे संघटन हाच त्यावर उपाय असल्याचे सांगितले.

अखंड भारतासाठीच्या अखंड प्रवासाच्या दगदगीचे परिणाम १९३९ मध्ये डॉक्टरांच्या प्रकृतीवर जाणवू लागले होते. त्यामुळे प्रवासावर, बैठकातील कामावर मर्यादा येऊन लागल्या. डॉक्टर त्यामुळे अस्वस्थ होत असत. झोपेतही बोलत असत ते, “संघ संघ आणि संघ”. १९४० सालच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाला त्यांनी भावपूर्ण असे मार्गदर्शन केले. सर्व देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांची सेवा करू शकलो नाही म्हणून खंत ही व्यक्त केली. “आपापल्या स्थानी परतल्यावर उत्साहाने संघ कार्याला लागा,” अशी हाकही दिली. स्वयंसेवकांच्या डोळ्यात पाणी तरळले. आता डॉक्टरांची मूर्ती दिसणे नाही ही कल्पनाच असह्य होती. दि. ९ जून १९४० ला  शिक्षार्थ्यांशी संवाद साधून डॉक्टर परतले.

दि. १५ जूनला प्रकृती ढासळली. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले.  तथापि, त्यांना हॉस्पिटलचे वातावरण आवडेना. म्हणून श्री. बाबासाहेब घटाटे यांचे घरी हलवले. त्यांनी श्री. यादवराव जोशींना बोलावून सांगितले, “आपल्या संघात घरगुती वातावरणाला महत्त्व आहे. कोणी संघाचा अधिकारी जर वारला तर त्याच्या प्रेतयात्रेत नेहमीची साधी व्यवस्था असावी, लष्करी थाटमाट किंवा इतर काही गोष्टी करू नये”. परमपूजनीय श्री गुरुजींना ते म्हणाले, “यापुढे संघाच्या कामाची सगळी जबाबदारी तुम्हाला सांभाळावयाची आहे असे समजा”. त्यापूर्वी काही दिवस त्यांनी श्री. आप्पाजी जोशी वगैरे निवडक सहकाऱ्यांजवळ मनोदय व्यक्त करून श्री गुरुजींना सरसंघचालक पदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले होते.

 दि. २१ जूनला सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी देह ठेवला, ते पंचत्वात विलीन झाले.

“स्मृतीने तुझ्या मात्र अश्रू गळावे,

सुचावे न काही मनाशी रडावे,

पुसूनीच अश्रू पुढे जावयाचे,

तुझा याचीतो स्पर्श मी एक हाते,

मुखी नाम राहो सदा केशवाचे!

तुझे तेज अंगी शतांशे जरीही

उजळून देऊ दिशा दाही दाही!!

लेखक- बन्सी जोशी

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *