ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी देहूतून प्रस्थान ठेवले

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे— बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥

                        सर्व सुखाचें आगरु । बाप रखुमा देवि वरु ॥

लेकुरवाळ्या विठ्ठलामध्ये आपली मायमाऊली शोधणाऱ्या तमाम वारकऱ्यांच्या उपस्थितीत, टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी दुपारी साडे तीन वाजता देहूतून प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहू नगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले वारकरी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत शनिवारी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू करत आहेत. पालखीचा पहिला मुक्काम आज देहुतच, इनामदारवाड्यात असेल.

हर्षोल्हासित आणि ढगाळलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी देहूतून प्रस्थान ठेवले. पालखीचे यंदाचे ३३८ वे वर्षे आहे. तुकोबांच्या पालखीचा अनुपम्य सोहळा पार पडत असताना वरुण राजाने हलकीच हजेरी लावली. आणि अवघे वारकरी सुखावले. गर्दीची लाट, पालखीचा थाट आणि भक्तीची वाट जोपासत वैष्णवांचा मेळा पंढरीच्या प्रवासाला निघाला.

‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग,’ असे भाव बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले होते. काठोकाठ भरलेल्या इंद्रायणी नदीकाठी वैष्णवांची गर्दी जमली होती.

मुख्य मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरतीला प्रारंभ झाला. त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महाअभिषेक झाला. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात आरती झाली. वैकुंठ स्थान मंदिरात पारंपरिक पूजा झाली. या वेळी देहू संस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख आणि मान्यवरांची उपस्थिती होती. सकाळी नऊ वाजता पालखी प्रस्थान सप्ताहातील काल्याचे कीर्तन झाले. साडेअकरा वाजता छत्रपती संभाजी महाराजांकडून जरीपटका प्राप्त झाला. तो संस्थानच्या विश्वस्तांनी स्वीकारला. भागवत धर्माचा ध्वज घेऊन आलेल्या मान्यवरांचा संस्थानतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.

मंदिराच्या मंडपात दुपारी दोन वाजता पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला.  देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात भानुदास महाराज मोरे,अजित महाराज मोरे, वैकुंठस्थान मंदिरात संजय महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली.

……

प्रस्थान सोहळा चालू असताना मंदिराच्या प्रांगणात भक्तिरसाला उधाण आले होते. आकाशात नभ दाटून आले होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. संस्थानतर्फे सत्कार सोहळा झाल्यानंतर विविधरंगी फुलांनी सजलेल्या पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. या वेळी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष झाला.पालखी मंदिरातून बाहेर आली आणि वरुण राजाने हलकीशी हजेरी लावली. त्याच क्षणी टाळ मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला. प्रेमाने, आनंदाने वारकरी देहभान विसरून नामघोषात तल्लीन झाले होते.

टाळ, मृदंगाचा सूर टिपेला पोचला अन् ‘पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’चा सूर उमटला. पालखीने मानाच्या अश्वांसोबत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ती इनामदार साहेब वाड्यात मुक्कामासाठी पोहोचली. रविवारी (१२ जून) पालखी आकुर्डी येथे मुक्कामासाठी निघणार आहे.

*ठळक मुद्दे*

– रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावट अन् रोषणाई.

-देहू ग्रामस्थांतर्फे ठिकठिकाणी भाविकांसाठी अन्नदान.

-पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली वारीवर नजर

– यंदा दिंड्या वाढल्या, संख्या 384 च्या पुढे

– अडीच लाख वारकऱ्यांची उपस्थिती

उद्या माऊलींच्या पालखीचे आळंदीहून प्रस्थान

आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (११ जून) दुपारी चार वाजता प्रस्थान ठेवणार आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी जमली असून अलंकापुरी सज्ज झाली आहे. रविवारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरवात होणार असून, माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असेल. सोमवारी (१२ जून) सकाळी पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल.

अंकली (जि. बेळगाव) येथून सदार ऊर्जितसिंह शितोळे यांच्याकडून माऊलींचे मानाचे अश्व आळंदी मुक्कामी पोहोचले आहेत. माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आली आहे. दोन दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गजबज सुरू झाली आहे. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत.

असा असेल प्रस्थान सोहळा

पहाटे पाचपासून धार्मिक विधींना प्रारंभ

सात वाजल्यापासून दर्शनबारी भाविकांसाठी खुली

दुपारी बारा वाजता महानैवेद्य

काल्याचे कीर्तन

माऊलींच्या पादुकांची प्रदक्षिणा

समाधी मंदिरात महापूजा

सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *