श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊली च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी – हरित वारी करिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कर्नाटक बेळगाव मधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, अमोल केदारी, माऊली रासने, विजय चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, राजेंद्र पायमोडे यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), मारुती कोकाटे, भाऊसाहेब फुरसुंगीकर, राजाभाऊ थोरात, योगेश गोंधळे यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.

महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेने वारीमध्ये पुढे चालत जात असतो. बाप्पाचे असेच आशिर्वाद कायम वारक-यांवर असावे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. आता श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतील. ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

माणिक चव्हाण म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत हरित वारी, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकारच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन मानाच्या अश्वांचे आगमन झाले. गणेश मंदिराच्या सभामंडपात मानाच्या अश्वांनी गणरायाला आगळीवेगळी मानवंदना दिली. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अश्वांचे स्वागत व पूजन करण्यात आले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *