पुणे(प्रतिनिधी)–पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व ‘हायव्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळाला. महायुतीमध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अखेर, खासदार पार्थ पवार यांनी मंगळवारी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी आपली नाराजी बाजूला सारून निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांचेही बंड शमण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) बाहेरून आलेल्या उमेदवाराला थेट संधी दिल्यामुळे पक्षात मोठी धुसफूस पाहायला मिळाली होती. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला होता, विशेषतः शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही आपला अर्ज दाखल केल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, असा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर ‘जिजाई’ निवासस्थानी पार्थ पवार, जय पवार, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. पार्थ पवार यांनी टिंगरे यांना पुढील काळात योग्य न्याय देण्याचे आणि सन्मान राखण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली. “मी दादांचा कार्यकर्ता असून पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे, पक्षात अनेकदा असे कठोर निर्णय घ्यावे लागतात,” अशी प्रतिक्रिया टिंगरे यांनी यावेळी दिली.
या निवडणुकीत एक रंजक योगायोग म्हणजे ‘सासऱ्याची जागा जावयाकडे’ गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले विजयी झाले होते आणि आता त्यांचे जावई विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने (अजित पवार गट) रिंगणात उतरवले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीला ही जागा सुटल्याने नाराज झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज भरले होते. मात्र, आमदार राहुल कुल यांच्या मध्यस्थीनंतर कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, या भेटीनंतर त्यांची बंडखोरी शमण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवून विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
पुण्याच्या या जागेसाठी आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा थेट सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील रिंगणात आहेत, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे असतील. विधान परिषदेच्या या जागेसाठी एकूण सात उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये तुषार कामठे (शरद पवार गट डमी), सुनील टिंगरे (अजित पवार गट डमी), तसेच उमेश म्हेत्रे आणि रणजीत तरे या अपक्षांचाही समावेश आहे.
















