पुणे जिल्ह्यातील मंचर येथे २,००० कोटींचे दूध भेसळ रॅकेट उघडकीस! अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांच्या धाडसी कारवाईत २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दूध भेसळ रॅकेट पुणे २०२६
दूध भेसळ रॅकेट पुणे २०२६

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका धाडसी संयुक्त कारवाईत राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या तब्बल २,००० कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीच्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. केवळ ५ रुपये खर्च करून तयार केलेले रासायनिक विषारी मिश्रण ७० रुपये प्रति लिटर या चढ्या दराने नैसर्गिक दूध म्हणून सामान्य जनतेच्या माथी मारणारी एक मोठी संघटित टोळी या कारवाईत उघडकीस आली असून, ही टोळी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा काळा बाजार करत मानवी आरोग्याशी क्रूर खेळ खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ४ आणि ५ जुलै २०२६ रोजी करण्यात आली.

अधिक वाचा  शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याने खळबळ

तपासादरम्यान या बनावट दुधाचा अत्यंत भयानक रासायनिक ‘फॉर्म्युला’ समोर आला आहे, जो कोणत्याही प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे दूध खरे वाटावे अशा रीतीने विकसित केला होता. दुधातील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘वे पावडर’ (Whey Powder), दुधाची घनता आणि एसएनएफ (SNF) वाढवण्यासाठी ‘स्कीमड मिल्क पावडर’ (SMP), तर नैसर्गिक फॅट दाखवण्यासाठी पाम तेलासारख्या ‘व्हेजिटेबल ऑईल’चा वापर केला जात असे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तेल, पावडर आणि पाणी यांचे मिश्रण एकजीव करण्यासाठी आणि दुधाला घट्टपणा व पांढरा शुभ्र रंग देण्यासाठी डिटर्जंट, शाम्पू आणि लिक्विड इमल्सिफायर यांसारख्या मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या रसायनांचा वापर करण्यात येत होता.

या कारवाईत पोलिसांनी मंचर येथील ‘मेसर्स नवकार डिस्ट्रीब्यूटर्स’ या मुख्य गोदामावर छापा टाकून भेसळीसाठी लागणारे विविध ब्रँड्सचे पावडर आणि रसायने असा सुमारे १,३८५ किलो साठा जप्त केला आहे. तसेच पिंपळगाव खडकी येथील ‘जय श्रीराम डेअरी फार्म’वरून २,७६७ किलो तयार केलेले बनावट सिंथेटिक दूध जप्त करण्यात आले, जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शेतात ओतून नष्ट करण्यात आले. या रॅकेटची पाळेमुळे केवळ एका गावापुरती मर्यादित नसून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अशा महाराष्ट्रातील ६ ते ७ जिल्ह्यांमध्ये या विषारी दुधाचे जाळे पसरल्याचे निष्पन्न झाले आहे.

अधिक वाचा  Network Science कडून संपूर्ण भारतीय बनावटीचे NSOffice.AI लाँच : उद्योगांमध्ये AI तंत्रज्ञानाच्या वापरा साठी एक क्रांतिकारी पाऊल

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती दामोदर म्हस्के यांनी ५ जुलै २०२६ रोजी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६१, १११ (संघटित गुन्हेगारी), १२३, २७४ आणि २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कडक तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोषींना जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे. या प्रकरणात एकूण २६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून सुशांत बबनराव हिंगे, संदीप कांतीलाल लोढा, हेमंत टेके आणि संजोग यादव यांसारख्या मुख्य सूत्रधारांचा यात समावेश आहे. सध्या प्रशासन हे विषारी दूध कोणत्या मोठ्या ब्रँड्सना पुरवले गेले याचा शोध घेत असून, आरोपींचे बँक व्यवहार, जीएसटी रेकॉर्ड आणि मोबाईल कॉल्सची कसून चौकशी केली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love