पुणे ‘पदवीधर’ निवडणूक:भाजप गड राखणार का?

राजकारण
Spread the love

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने या निवडणुकीला अधिक महत्व आले आहे. या मतदार संघातून दोनदा आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आमदार झाले असले तरी त्यांच्यावर हा गड राखण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीचे आहे. त्यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. सतरा दिवसांवर निवडणूक आलेली असताना कोणत्याही पक्षाने आपला  उमेदवार जाहीर केलेला नाही. या निवडणुकीसाठी पक्षांतर्गतही उमेदवारीसाठी रस्सीखेच  पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे (पुणे), माणिकराव पाचीव चुयेकर (कोल्हापूर), संग्राम देशमुख (सांगली), शेखर तळेगावकर (सातारा) आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख (सोलापूर) यांची नावे स्पर्धेत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सुरवातीला सचिन पटवर्धन यांचे नाव आघाडीवर होते. आता पाटील यांचे दुसरे समर्थक राजेश पांडे यांचे  नावही पुढे आले आहे. यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत औत्सुक्य वाढले आहे.  

दरम्यान, ही निवडणूक महाविकास आघाडी सरकार संयुक्तपणे लढणार आहे. त्यामुळे आघाडीत जवळपास एकमत झाले असून पदवीधरची जागा राष्टवादी कॉंग्रेस आणि शिक्षक मतदार संघाची जागा कॉंग्रेसला असे सूत्र ठरल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून पदवीधर मतदार संघासाठी कोणीही इच्छुक असल्याचे अथवा कॉंग्रेसकडून तशी तयारी केली नसल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादीकडून मात्र,अरुण लाड व श्रीमंत कोकाटे शर्यतीत आहेत. त्यांनी गेल्या दीड वर्षांपासून तयारी सुरु केली आहे. पदवीधरांचे फॉर्म भरणे, गाठीभेटी घेणे त्यांनी सुरु ठेवले आहे.  

पुणे पदवीधर मतदार संघाचे कार्यक्षेत्र पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर असे आहे. मागच्या वेळी (२०१४)  सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्यातील मत विभागणीमुळे चंद्रकांत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. अत्यंत चुरशीने आणि लक्षवेधी ठरलेल्या निवडणूकीत चंद्रकांत पाटील २ हजार ३८० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील तसेच अरुण लाड दोघांनीही आपला दावा सांगितला होता. यामध्ये सारंग पाटील यांना संधी मिळाली होती. त्यामुळे अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्या मध्ये आघाडीची मते विभागल्यामुळे दोघांनाही पराभव पत्कारावा लागला होता.

यावेळी पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी सारंग पाटील यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. परंतु, त्यांनी मध्यंतरी ते पदवीधर निवडणुक लढणार नसल्याचे झीर केले होते. त्यामुळे अरुण लाड यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. मात्र, त्यांच्याबरोबरच श्रीमंत कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, बाळराजे पाटील,प्रताप माने यांचीही नावे चर्चेत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे आणि राष्ट्रवादीकडून कोणी बंडखोरी केली नाही तर भाजपला पुणे पदवीधरचे जागा राखणे कठीण जाणार आहे. भाजपाकडून पदवीधरांची नोंदणी आणि संपर्क मोहीम जोरदार राबविली जात आहे. परंतु, भाजपसमोर ही जागा राखण्याचे आव्हान मोठे असून त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे हे नक्की.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *