पुणे—मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पाठिंबा जाहीर केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती समन्वयकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच येत्या शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून ५० टक्केच्या आतमधील आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मोर्चाचे राज्य समनव्यक राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, अनिल ताडगे, रेखा कोंडे, प्रफुल्ल गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक भागात साखळी उपोषणास बसण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः आंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मराठा कांती मोर्चाचे वतीने साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे. तसेच शहरातील व जिल्हयातील विविध भागांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना मेळावे, कार्यक्रमास येवू नये व समाजाने त्यात सहभागी न होण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार आहेत.
यावेळी राजेंद्र कुंजीर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेतेमंडळींना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा मार्फत घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यक्रम आणि बैठका असतील, त्या ठिकाणी आम्ही काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना मेळावे, कार्यक्रमास येऊ नये असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं आहे. तसेच समाजाने सहभागी होऊ नये, यासाठी मराठा समाजाला मराठा क्रांती मोर्चाला आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चा ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहे. याचबरोबर पुण्यात २८ तारखेला कँडल मार्चचं देखील आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यांपर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही साखळी उपोषण
पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आंदोलन मिळत नाही, तोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकही राजकीय नेत्याला सभा घेऊ देणार नाही, असा इशारा पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाने दिला आहे.