कृषी आणि कामगार विधेयकाला विरोध होत असताना एवढी घाई का? -अजित पवार

राजकारण
Spread the love

पुणे--केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकाला जो विविध स्तरातून विरोध होत आहे तीच आमचीही भमिका आहे. शेतकरी, शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष या विधेयकांना विरोध करत असताना एवढी घाई करण्याचे कारण काय? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, या विधेयाकांची राज्यात अंमलबजावणी होऊ नये असा आमचा प्रयत्न असून त्यासाठी आम्ही अभ्यास करतो आहोत. त्यासाठी विधी व न्याय खात्याचे , अॅडव्होकेट जनरल यांची मते जाणून घेत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवून सुनावणी व्हावी हाच आमचा प्रयत्न

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना पवार म्हणाले , जो निर्णय मंत्रिमंडळाला योग्य वाटला तो निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कशी व्यवस्थित होईल हे महत्वाचे आहे. वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मागण्या आहेत. त्याबद्दल राज्यातील महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण टिकण्याकरिता जेवढा प्रयत्न नायालायाच्या स्तरावर करायला पाहिजे होता तो सर्व केला. पूर्वीचेच वकील दिले त्याशिवाय अधिकचे वकील दिले. त्यामुळे कुणीही सरकारमध्ये काम करीत असले तरी कुठल्याच सरकारला असे वाटणार नाही की दिलेले आरक्षण टिकू नये.

आम्हाला न्यायलयाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते आहे. तामिळनाडू सरकारने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले. दुसऱ्या राज्यांनेही अशा प्रकारची आरक्षणे दिली आहेत. केंद्र सरकारने विशेष मागास वर्गासाठी १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. याच्या विरुद्ध्हही याचिका दाखल झाल्या. परंतु दिलेल्या आरक्षणाला कुठे स्थगिती देण्यात आली नाही. ते तसेच ठेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठापुढे जाण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे आमचीही मागणी किंवा प्रयत्न हा आरक्षण स्थगिती उठवून सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठापुढे सुनावणी व्हावी अशीच आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील मंदिरे, मशीद केव्हा सुरू होणार त्या प्रश्नावर म्हणाले की, देशभरात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. राज्य सरकार प्रत्येक नागरिकाचा विचार करून निर्णय घेत आहे. प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्याने सुरू होत असून मंदिर ,मशीद ,गुरुद्वारा ,चर्च उघडावे, अशी मागणी होत आहे. आम्हाला देखील वाटते की, हे सुरू व्हावे. पण करोनाची बाधा होऊ नये, त्या दृष्टीने आपण सावधपणे टप्प्या टप्प्याने निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राज्यातील करोना सद्यस्थितीत बाबत अजित पवार म्हणाले की, एका बाजूला करोना बाधित रुग्ण आढळत आहे. तर दुसर्‍या बाजूला बरे होऊन रुग्ण घरी जाण्याची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांची आजवर पालन प्रत्येक सण उत्सवा दरम्यान केले आहे. तसेच नवरात्र आणि दसरा या सणात देखील करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याच बरोबर पुणे शहरात करोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी सद्य स्थितीला 60 दिवसांवर गेला आहे. मात्र पुण्यात गणेश उत्सवानंतर करोना वाढला असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी ट्वीट करून अभिवादन केले होते. परंतु, पुन्हा ही पोस्ट काढून घेण्यात आली याबाबत विचारले असता अजित पावर म्हणाले, ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबद्दल चांगले बोलावे ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. समाजकारण, राजकारण करताना काही गोष्टी वरिष्ठांच्या ऐकाव्या लागतात. परंतु, राज्यात कोरोनाचे संकट, अतिवृष्टीचे संकट अशा अनेक समस्या आहेत. असे असतानाही सुशांतसिंह या अभिनेत्याच्या मृत्युच्या बाबतीतल्या किंवा अशा प्रकारच्या वृत्तांना अधिकची प्रसिद्धी दिली जाते. अर्थात जनतेने काय पाहावे, मिडीयाने काय दाखवावे हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, मुलभूत समस्यांना अधिक महत्व दिले पाहिजे असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *