युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं- संजय राऊत

राजकारण
Spread the love

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसते तर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या क्षमतेबाबत कॉंग्रेस आणि युपीएमध्ये साशंकता असल्याचे दिसते आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्व कोणी करावं याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

देशात भाजपाप्रणीत एनडीएसमोर काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच, सोनिया गांधी यांनी आत्तापर्यंत युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली असल्याचं देखील राऊत म्हणाले.

“सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतंय”, असं राऊत यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *