पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी स्पुक्टो कार्य क्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम फुक्टो) कार्यकारी मंडळाच्या ८ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्राध्यापकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजचा आंदोलनाचा ८ वा टप्पा होता.
प्राध्यापकांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ ते १० मे २०१३ या कालावधीत केलेल्या परीक्षा बहिष्कार आंदोलनामुळे बेकायदेशीर रित्या कापलेल्या ७१ दिवसाच्या पगाराचा परतावा मा. उच्च न्यायालयाच्या दि. २३ जानेवारी २०१९ च्या निर्णयानुसार करून उच्च न्यायालयाचा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा व शासन निर्णय दि. ७ डिसेंबर २०२० ची अंमलबजावणी करावी.
२) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) दिनांक १८ जुलै २०१८ च्या रेग्युलेशन नुसार समग्र योजना जशीच्या तशी लागू करणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करावी
३) अर्धवेळ महाविद्यालयीन शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा .
४) केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला सातवा वेतन आयोग फरक रोखीने द्यावा.
५) युजीसी च्या धोरणानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांची शंभर टक्के रिक्त पदे भरण्यात यावीत.
६) सहसंचालक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.
७) एम फिल पदवीप्राप्त व १९९२ ते २०१० दरम्यान नियुक्त प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा.
८) सन १९९२ ते २००० दरम्यान नियुक्त प्राध्यापकांना एम.फील. पदवी आधारावर दिलले कॅसचे लाभ काढून घेणे याबाबतची बेकायदेशीर भूमिका ताबडतोब थांबवावी.
९) डी.सी.पी.एस. धारक प्राध्यापकांचे आजपर्यंतचे हिशोब पूर्ण केल्यानंतरच एन.पी.एस. चे खाते उघडण्यात यावे