पंचमीचा सण आला….

महाराष्ट्र लेख
Spread the love

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे सहाजिकच त्याचे प्रतिबिंब आणि प्रभाव आपण साजऱ्या करीत असलेल्या सण समारंभावर झाला आहे.विठूभेटीच्या तृप्तीचा अपूर्व सोहळा मनात साठवत पुन्हा प्रापंचिक वाटचाल नव्या उमेदीने करायला आपण सारेच सज्ज होतो.आपला शेतकरी राजा तर हिरव्यागार राखणीला आलेल्या पिकाकडे बघत आनंदून जातो.

कोसळणाऱ्या आषाढधारा आता काहीशा शांत झालेल्या असतात,ऊनपावसाचा खेळ करत सप्तरंगी इंद्रधनुषी कमान आकाशात दिसली की निसर्ग जणू श्रावण सुरू झाल्याची वर्दीच देत असतो.हिंदूंच्या सण-समारंभाची सुरवात करणारा आणि सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा श्रावण महिना व्रत-वैकल्यांची शिकवण देत उत्साह,अन मांगल्याची उधळण करत येतो.

श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी नागपंचमी.

चल गं सये वारुळाला वारुळाला,

नागोबाला पूजायाला पूजायाला ।

अशा लोकगीताची आठवण करून देणारी ही नागपंचमी भारतभरात आणि महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात साजरी होते.आपल्या या सर्व सणांच्या मागे अतिशय रोचक अशा आख्यायिका आणि कथा प्रचलित आहेत.

श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला व यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण सुरक्षित वर आले त्या दिवसापासून नागपूजा करण्याची प्रथा रूढ झाली.

अशाच एका पुराणकथे नुसार भगवान शंकराने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले होते आणि त्यांनीही हलाहलाचा काही अंश प्राशन केला. त्यामुळे शिवशंकर नागांवर प्रसन्न झाले. नागांनी सर्व सृष्टीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची पूजा केली जाते.

नागपंचमी सणांच्या कहाण्या आपण प्रत्येकाने लहानपणी ऐकल्या,वाचल्या आहेत.खरंतर या कहाण्या,कथा म्हणजे आपण निसर्गाशी तद्रूप होऊन निसर्गातील प्राणिमात्रां विषयी कृतज्ञता व्यक्त करावी यासाठीच त्या कथन केलेल्या असतात.आपल्या शेतकरी बांधवांचा खरा मित्र व शेताचे रक्षणकर्ते म्हणजे नाग आणि साप..

शेतातल्या पिकांचे,धान्याचे नुकसान करणाऱ्या उंदरांवर नागांमुळे नियंत्रण रहाते.पर्यावरणाची ही जैविक अन्नसाखळी कार्यरत रहावी,तसेच हे निसर्गचक्र अबाधित रहावे यासाठीच या सणाची योजना आपल्या पूर्वजांनी केली आहे.

असं म्हणतात की त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग अतिशय भयंकर प्राणी आहे.शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांचा कधीतरी नागाशी सामना होतोच. म्हणून या नागदेवतेपासून रक्षण व्हावे,त्याची भीती राहु नये त्यासाठी वर्षातून एक दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा प्रचलित झाली असावी.यादिवशी जमीन खणणे, नांगरणे, टाळले जाते.अशा या नागदेवतांचे स्थान मोठमोठ्या वृक्षांखाली किंवा मोठ्या वारुळामधे असते.या नागदेवता गौण देवतांमध्ये गणल्या जातात.तर काही ठिकाणी त्यांचा स्थानदेवता असाही उल्लेख आढळतो.

भारताच्या सर्व प्रांतांत नागपंचमीचा सण साजरा होतो. काशीमध्ये ‘नागकूप’ नावाच्या तीर्थावर विद्वान पंडित या दिवशी शास्त्रचर्चा आणि नागाची पूजा करतात. प्रसिद्ध वैयाकरण पतंजली हा शेषाचा अवतार असून त्याचे वास्तव्य नागकूपात आहे, अशी समजूत त्यामागे आहे. बंगालमध्ये सर्पदेवता मनसादेवीची, तर राजस्थानमध्ये पीपा, तेजा इ. नागदेवांची पूजा करतात. प्रांतपरत्वे या नागपूजनात थोडाफार फरक आढळतो.महाराष्ट्रातही बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आहे.

एका पौराणिक कथेनुसार ‘आस्तिक’ नावाच्या मुनींनी गायीच्या दुधाने सापांना स्नान घातले तो दिवस श्रावण पंचमीचा होता म्हणून नागपंचमी पूजेचा प्रघात.नागांना, सापांना ‘दुग्धस्नान’ ही कथा मागे पडून चुकीचा म्हणजे नागांना,सापांना दूध पाजण्याची प्रथा रूढ झाली जी वैज्ञानिक दृष्टया चुकीची आहे कारण नाग,साप ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अन्नसाखळीत दूध हा घटक येतच नाही.याविषयी सर्पमित्र तसेच पर्यावरण प्रेमींनी जनजागृती केली.नाग आणि सापांचे संवर्धन व्हावे म्हणून आपणही अशा चुकीच्या समजुतीचा विरोध करायलाच हवा.

 नागपंचमीच्या या सणाने सर्वाधिक आनंद होतो तो  समस्त स्त्रीवर्गाला. उत्साह द्विगुणित करणाऱ्या या श्रावणपंचमीच्या सोहळ्याने ‘ती’ अगदी सुखावून जाते,मग ती नवविवाहित असो की संसारात रमलेली..या नागपंचमीला माहेराहून न्यायला येणाऱ्या भाऊरायाची ती अगदी आतुरतेनं वाट पहाते. निसर्गतःच स्त्रियांचं भावविश्व अतिशय कोमल असते हे लक्षात घेऊनच आपल्या या सण,व्रत वैकल्यांची व आपल्या संस्कृती संवर्धनाची जबाबदारी पूर्वापार पासून स्त्रियांना दिली गेली व अतिशय उत्तम रीतीने त्यांनी ती सांभाळली आहे..यादिवशी भाज्या चिरणे,तळणे या गोष्टी वर्ज्य मानल्या आहेत.

आहारशास्त्रीय दृष्टया याकाळात झालेला वातावरणात बदल लक्षात घेता दूध,लाह्यासारखे हलके पदार्थ किंवा उकडून केलेले दिंडही तितकेच पौष्टिक आणि ऊर्जा वाढवणारे असतात,शिवाय रोजच्या स्वयंपाकाची धामधूमीतून स्त्रीला काहीशी विश्रांती मिळावी यासाठी ही असे स्वयंपाकाचे व्यस्थापन, नियमन केले गेले असावे.

नागपंचमी म्हणजे माहेरचा रेशमीबंधच.. सासर-माहेरच्या नात्याला जीवापाड जपणारी स्त्री कुटुंब व्यवस्थेचा भक्कम आधार असते.बहीण आपल्या भावाच्या सुखसमृद्धी,दीर्घायुष्यासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करते. त्यासंबंधी वाचलेल्या आख्यिकांचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते की प्रत्येक सुखदुःखात भाऊ-बहिण एकमेकांचा आधार व्हावेत हाच यामागे उद्देश असावा…

नागपंचमी आणि मेंदी यांचेही एक वेगळंच अतूट नाते या सणाच्या निमित्ताने प्रचलित आहे.या दिवशी स्त्रियांनी हातावर रेखलेली मेंदी हे नागदेवते कडून वचन घेतल्याचे उमटलेले चिन्ह मानलं गेलंय,पण त्याचाही जरा शास्त्रीय विचार केला तर लक्षात येत की या वर्षाऋतूच्या काळात शरीरांतर्गत उष्णता वाढते, हा दाह कमी करणारी मेंदीची पाने यावर फार गुणकारी समजली जातात.त्यामुळे तळहातावर रेखलेल्या मेंदीने हातापायची जळजळ कमी होण्यास मदत होत असावी,तसेच हातावर लाल चुटुक रंगलेली ही सुरेख मेंदी पाहून अर्थातच मन आनंदी ,प्रसन्न होतेच की..नागपंचमीला खेळले जाणारे झोके,झिम्मा,फुगडी हे खेळ म्हणजे त्यावेळचे फिटनेस क्लबच असावेत.

ज्येष्ठ,आषाढ महिन्यातल्या धुवांधार पावसाने घरा बाहेर पडणेही शक्य होत नसे म्हणून स्त्रियांनी एकत्र येऊन खेळाची ही पद्धत रूढ झाली,खेळाने टिकून रहाणारी लवचिकता तिला आधिक कार्यक्षम बनवत असे.श्रावणातला हिरवाईने वेढलेला परिसर पाहून नवी ऊर्जा मिळते.वडाच्या पारंब्याचा आधार घेत घेतलेले झोके हा नागपंचमीचा अगदी आकर्षक खेळ आहे. झाडांच्या फांद्यावर उंच घेतलेले हे झोके म्हणजे ऑक्सिजनचा भरपुर मिळण्याचे ठिकाणच..

निसर्गाच्या मुक्त वातावरणात मिळणारा हा आनंद व  त्यासोबत गायलेली ती लोकगीते म्हणजे स्त्रीमनाचे जणू हळवे हुंकारच होते..लोकगीतांच्या माध्यमातून साधलेला हा मनमोकळा संवाद आजच्या परिभाषेत सांगायचा तर ‘स्ट्रेस बस्टर’ च होता.

प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या भारत देशाच्या या सण,परंपरा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन आपण नेहमीच केले.येणाऱ्या नव्या पिढीला त्या प्रत्येकामागे असलेला वैज्ञानिक,शास्त्रीय दृष्टीकोन समजून सांगितला तर नागपंचमीचा हा सण नक्कीच आधिक आनंदाने साजरा होईल.

©विशाखा कुलकर्णी

चिंचवड

दि.१ऑगस्ट २०२२

*********************

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *