पुणे(प्रतिनिधि)–प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती हातातून सटकायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असते. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असा अप्रत्यक्ष टोला मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. (Nobody comes with the eternal belt of power)
पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत ते बोलत होते. राज यांनी सभांना होणारी गर्दी आणि त्याचं मतांमध्ये होणारं रुपांतर यावर भाष्य केलं. ते म्हणाले, पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. ज्या दिवशी सत्ता येते, त्या दिवसापासून सत्ता जाते. मला म्हणतात तुमच्या सभेला गर्दी होते. पण, मते मिळत नाहीत. पण, २००९ मध्ये १३ आमदार काय मटक्याच्या आकड्यावर निवडून आले होते काय, लोकसभेला उमेदवारांना लाखावर मते पडली होते. पण, प्रत्येकाचा काही काळ असतो. सुरुवातीला भाजपचे किती खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या सभा होत होत्या. पण, मते किती पडत होती. त्यावेळी काँग्रेसशिवाय काय पर्याय होता. त्याप्रमाणे प्रत्येकाचा काही काळ असतो, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका
मी पत्रकारिता पाहिली नाही तर,अनुभवली आहे. पत्रकारितेतून राजकारणात आलो. आताची पत्रकारिता बघत आहे. पत्रकारिवेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता. महाराष्ट्र हितावर निर्भीडपणे बोलावे, लिहावे. आज अनेक पत्रकार वाया गेले आहेत. तेच महत्त्वाच्या हुद्यावर बसले आहेत. पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. पूर्वी लपूनछपून करत होते. आता उघडपणे काम करत आहेत. हे लेबल लावलेले पत्रकार परिषदेत येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. हे काय म्हटला आणि तो काय म्हटला असेच प्रश्न विचारत आहेत. राजकारणाचा स्तर, भाषा बदलली आहे. तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात. तुम्ही नाही दाखविल्यावर स्वच्छतागृहात बोलतील का, असेही ते म्हणाले.
ब्लू प्रिंट त्याचंच एक जिवंत उदाहरण. मी ती सादर केली त्यानंतर कोणी ती ब्लू प्रिंट पाहिली नाही. फक्त मला हिणवलं गेलं. कोणी तरी सुपारी दिली की हे पत्रकार मला येऊन विचारणार. आता मला सांगा पत्रकार हल्ला ठीक आहे, तुमच्यावर हल्ला झाला की जसं वाईट वाटतं, तसंच आम्हाला ही वाटतं. तुमचं काम आमचे डोळे उघडणे, समाजाला दिशा दाखवणे, प्रबोधन करणे हे आहे, असंही त्यांनी म्हटलं
पण जाणीवपूर्वक काहीही ठरवून बातम्या देणे हे तुमचं काम नाही. पत्रकारांना काही बोललं की त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटतं, मग राज ठाकरेंबाबत काही बोलल्यावर त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटत नसेल का? म्हणजे तुमचं ते कुटुंब अन आमचं काय? याचं भान पत्रकारांनी ठेवायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.
अजित पवार सत्तेत गेले याचा पत्रकारांना राग यायला पाहिजे. महाराष्ट्रात काय चालू आहे. सहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोट्यवधी रुपयांचे भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आणि सहा दिवसांनी ते सत्तेत सहभागी होतात. याचा पत्रकारांना राग येत नाही. त्यावर केवळ हसतात आणि सोडुन देतात. हा घरातून निघाला आणि येथे पोहोचला या काय बातम्या आहेत का, निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.