स्त्री लेखिकांची खंडित परंपरा पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई

महाराष्ट्र लेख
Spread the love

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

नमन तुला । शंकरा । श्रीधरा ।।

नीलकंठ शिवशंभू सदाशिव

तुजिया चरणी आमचा भाव ।

अज्ञानी लेकरा उद्धरा।।

आम्ही लेकरे तुला प्रार्थितो

विद्या देई ज्ञान इच्छितो

दैन्यासुर संहारा । श्रीधरा ।।

ईशस्तवन (सावित्रीबाई फुले यांच्या कविता)

ज्या काळात स्त्रियांनी शाळेत शिक्षण घेणे कष्टप्रद होते, महिलांची स्थिती वाईट झाली होती, इंग्रजांचे राज्य असताना होणारे अत्याचार सहन करत भारत लढा देत होता त्यावेळी शिरवळपासून जवळच असलेल्या नायगाव नावाच्या गावी ३ जानेवारी १८३१ रोजी खंडोजी नेवसे पाटलांच्या घरात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षी पुण्यात असलेल्या ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्योतिबा हे सुधारक विचारांचे लेखक व समाजसुधारक होते.

सावित्रीबाई धुळपाटीवर अक्षरे गिरवत असत. नंतर काही काळाने ज्योतिरावांनी वडिलांना महिलांसाठी शाळा सुरू करण्याची कल्पना सांगताच त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढले. स्त्री लेखिकांची खंडित झालेली परंपरा सवित्रीबाईंच्याच काळात सुरू झाली. सावित्रीबाईंच्या अनेक कवितांमध्ये स्त्रीवादी भावना, प्रबोधन यांचा मुख्यत्वे समावेश दिसून येतो.

सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे ‘काव्यफुले’. या संग्रहात त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या आहेत. यात मुख्यत्वे निसर्गकविता, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक तसेच बोधपर कवितांचा समावेश आहे. यातच ‘जाईचे फुल’ , ‘मातीची ओवी’, ‘शिकण्यासाठी जागे व्हा’ या निसर्गावर असलेल्या आणि सामाजिक विषयांवरील कविता तसेच शिवप्रार्थना, शिवस्तोत्र अश्या काही प्रार्थनापर कविता आढळतात. छत्रपती ताराबाई यांच्यावर केलेल्या कवितेत त्या ताराबाईंचा कोल्हापूरची जगदंबा असा उल्लेख करतात. काव्यफुले मधील अर्पणिका ही कविता ‘वसंततिलका’ ह्या अतिशय प्रसन्न करणाऱ्या वृत्तात लिहिली आहे. त्यांच्या कवितांवर अनेकदा रामदासांचा प्रभाव दिसून येतो असे प्रतिपादन सुरेंद्र बारलिंगे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ) करतात.

‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह शिलाप्रेसने प्रकाशित केलेला ग्रंथ असून त्याच्या मुखपृष्ठावर शिवपार्वतीचे चित्र आहे. सावित्रीबाईंच्या हस्ताक्षरात मोडी लिपीत लिहिलेले काही ग्रंथ उजेडात आले आहेत. त्यांच्या लेखनामुळे १८५२ मध्ये मेजर कँडी ह्यांच्या हातून त्यांना पुरस्कार मिळाला. त्याच वेळी सरकारी शाळांना अनुदान देखील देण्यात आले. ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. ज्योतिबांचे हे पहिले काव्यमय चरित्र होय. त्यात बावन्न कडवी असल्याने त्याला बावन्नकशी असे नाव देण्यात आले. ह्या हस्तलिखिताच्या शेवटी त्यांनी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी देखील दिसून येते. तसेच शिवमहिम्न स्तोत्राचे त्यांनी ओवीबद्ध रूपांतर देखील केले. सामान्य शाळेतून शिक्षण घेऊन त्यांनी मुलींसाठी शाळा चालवली. वंचित घटकांसाठी त्यांच्या मनात कणव होती.

१८९० साली ज्योतिबांचे निधन झाल्यानंतर देखील न डगमगता त्यांनी आपले काम चालूच ठेवले. १८९३ साली सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले. आपल्या लिखाणातून आणि भाषणातून कर्ज, व्यसन इत्यादी चुकीच्या गोष्टींवर हल्ला चढवला. १८५३ मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करुन त्यात भरीव कार्य केले. कर्ज, व्यसन केल्याने समाजावर काय परिणाम होतो हे त्यांनी अनेक छोट्या छोट्या उदाहरणातून दाखवून दिले. १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. सावित्रीबाई प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करायला जाऊ लागल्या. पण प्लेग हा रोग संसर्गजन्य असल्याने त्यांनाही प्लेगची बाधा झाली. अश्यातच १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

या ६६ वर्षांच्या काळात त्यांनी फार मोठी ग्रंथसंपदा लिहिली. ज्योतिबांची भाषणे संग्रहित करुन त्यांची पुस्तके प्रकाशित केली. काव्यफुले, बावन्नकशी सुबोध रत्नाकर तसेच अनेक ज्ञात-अज्ञात ग्रंथांची निर्मिती त्यांच्या हातून झाली. ज्योतिबांना लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची विचारक्षमता जाणवते. त्यांच्या भाषणातून वाईट चालीरितींवर केलेला प्रहार आजही प्रेणास्वरुप ठरतो. मोडी लिपीत लिहिलेल्या अनेक ग्रंथांचे आज देवनागरीमध्ये रूपांतर केले गेले आहे. त्यांच्या देवनागरी लिपीत लिहिलेल्या अनेक पुस्तकांची पाने देखील सापडली आहेत. सावित्रीबाई फुले ह्यांना शत शत नमन!!                                                          

सुमेध श्रीवर्धन बागाअीतकर

( लेखक – साहित्याचे अभ्यासक आहेत.)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *