पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटणाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवल्या प्रकरणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रशानंत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द अजित पवारांनीच दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
उद्घाटनाला कार्यकर्त्यांची झालेली गर्दी कोरोना नियमांची पायमल्ली करणारी होती. अजित पवारांच्या उपस्थितीत ही गर्दी झाल्यामुळे भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी थेट अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अजित पवार यांनी या गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. अशा पद्धतीनं गर्दी करायला नको होती, असं अजितदादा म्हणाले होते.
दरम्यान, पुढच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही. सर्व नियम पाळू. गर्दी जमवल्या प्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
अजित पवारांनीही केली दिलगिरी व्यक्त
या प्रकरणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “मला प्रशांतने 10 तारखेला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला भेट द्या, माझ्या स्वत:च्या मनामध्ये होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं एकंदरीत वातावरण, नियम, लोकांची उपस्थिती पाहता तसं केलं नाही. आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी 7 वाजतादेखील उड्डाणपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती” असा दावा अजित पवार यांनी केला.
“गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रशांतला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.