नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित-अर्थव्यवस्था आणि भारताची सांस्कृतिक ताकद अशा सात क्षेत्रांवर भर देणारी ‘शक्तीची सप्तधारा’ ही संकल्पना त्यांनी जाहीर केली. भारताने आता मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्या स्वप्नांना वेगाने पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी यांनी देशातील पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली. संकटाच्या काळात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात ‘वंदे मातरम्’च्या घोषणेचा विशेष उल्लेख करत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला.
‘सप्तधारा’तून विकासाचा नवा वेग
‘विकसित भारत २०४७’चे लक्ष्य गाठण्यासाठी देशाच्या विकासाला सात दिशांनी बळ देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले. उत्पादन क्षमता, कृषी व अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान व नवसंशोधन, गतिशक्ती, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, हरित व निळी अर्थव्यवस्था आणि भारताची सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांना त्यांनी ‘शक्तीची सप्तधारा’ असे संबोधले.
उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासार्ह केंद्र बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उत्पादनाची किंमत, गुणवत्ता आणि प्रमाण या तीन बाबींवर भर देतानाच ‘झिरो डिफेक्ट’ उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. कृषी क्षेत्रात रासायनिकमुक्त शेती, मिलेट्स, मसाले, फळे आणि फुलांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा संकल्प मांडण्यात आला.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि रोबोटिक्समध्ये भारताने केवळ ग्राहक न राहता संशोधन आणि नवकल्पनांचे जागतिक केंद्र बनावे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. स्वदेशी ६जी तंत्रज्ञानातही भारताने नेतृत्व करावे, असे त्यांनी सांगितले.
हायस्पीड कनेक्टिव्हिटीपासून संरक्षण स्वावलंबनापर्यंत
‘गतिशक्ती’च्या माध्यमातून हायस्पीड रेल्वे, आधुनिक महामार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि बंदरांच्या माध्यमातून देशातील कनेक्टिव्हिटीला नवा वेग देण्यावर भर देण्यात आला. संरक्षण क्षेत्रात ड्रोन, काउंटर-ड्रोन आणि हायपरसोनिक तंत्रज्ञानासह अत्याधुनिक संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतातच करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हरित हायड्रोजन, सौरऊर्जा, सागरी अर्थव्यवस्था, मत्स्यव्यवसाय आणि किनारी पर्यटन या क्षेत्रांना चालना देत भारताने हरित आणि निळ्या अर्थव्यवस्थेत मोठी झेप घ्यावी, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. योग, आयुर्वेद, भारतीय संस्कृती, चित्रपट, अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या माध्यमातून भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ जगभर पोहोचवण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत आत्मनिर्भरतेवर भर
गेल्या काही वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा दाखला देताना मोदी यांनी सेमीकंडक्टर उत्पादन, ऊर्जा, पाइप गॅस, सौरऊर्जा आणि रेल्वे विद्युतीकरणाचा उल्लेख केला. सेमीकंडक्टर क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन वाढविण्याबरोबरच ऊर्जा सुरक्षेसाठी अणुऊर्जेचा विस्तार करण्याचे लक्ष्यही त्यांनी मांडले.
२०४७ पर्यंत अणुऊर्जेची क्षमता १०० गिगावॉटपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त करताना देशातील ऊर्जा गरजा स्वदेशी पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. तेल आणि नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत शोधालाही वेग देण्याची घोषणा करण्यात आली.
सौरऊर्जेच्या वाढत्या क्षमतेचा उल्लेख करताना घराघरांत सौरऊर्जा पोहोचविण्याच्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. पाइप गॅसच्या विस्तारापासून रेल्वे विद्युतीकरणापर्यंत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या बदलांचा उल्लेख करत भारताच्या विकासाचा वेग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापारविस्तार आणि भारतीय कंपन्यांना जागतिक लक्ष्य
जागतिक व्यापाराच्या बदलत्या समीकरणात भारताने अधिक आक्रमकपणे जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची गरज मोदी यांनी व्यक्त केली. विविध देशांशी झालेल्या मुक्त व्यापार करारांचा लाभ एमएसएमई, वस्त्रोद्योग आणि सी-फूड उद्योगांना मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्याचे आवाहन करताना आगामी दशकात फॉर्च्युन ५००च्या यादीत भारताच्या मोठ्या संख्येने कंपन्या असाव्यात, जगातील आघाडीच्या बँका आणि औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा निर्माण व्हावा, अशी महत्त्वाकांक्षा त्यांनी व्यक्त केली.
तरुणांच्या हातात एआयचे कौशल्य
पंतप्रधानांच्या भाषणातील सर्वाधिक लक्षवेधी भाग तरुणांसाठीच्या घोषणांचा ठरला. स्टार्टअप क्षेत्रातील वाढीचा उल्लेख करत त्यांनी एक लाख कोटी रुपयांच्या नाविन्यता निधीची घोषणा केली. येत्या काळात एक कोटी तरुणांना एआयचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य त्यांनी मांडले.
शिक्षण क्षेत्रातील विस्ताराबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांवरील कोचिंगचा आर्थिक भार कमी करण्यासाठी डिजिटल माध्यमातून मोफत ऑनलाइन कोचिंगचे देशव्यापी नेटवर्क उभारण्याची घोषणा करण्यात आली.
क्रीडा क्षेत्रातही भारताने मोठे लक्ष्य ठेवले आहे. २०३०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदाबरोबरच २०३६च्या ऑलिम्पिकसाठी भारताची दावेदारी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले. पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा गुणवत्ता शोधण्यासाठी देशव्यापी ‘टॅलेंट हंट’ मोहीम राबविण्याची घोषणा त्यांनी केली.
महिलांसाठी ‘लखपती दीदी’चे नवे लक्ष्य
महिला सक्षमीकरणावर भर देताना आतापर्यंत तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे लक्ष्य साध्य झाल्याचे सांगून आता सहा कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे नवे उद्दिष्ट मोदी यांनी जाहीर केले. महिलांसाठीच्या ३३ टक्के आरक्षणाच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सामाजिक सुरक्षेचा विस्तार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण यांचाही त्यांनी उल्लेख केला. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारी योजनांचा विस्तार करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्षलवादाविरोधात कठोर भूमिका
अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर मोदी यांनी नक्षलवादाविरोधातील कारवाईचा उल्लेख केला. जंगलातील सशस्त्र नक्षलवाद कमी होत असला तरी समाजात भीती आणि हिंसक विचारसरणी पसरविणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नागरी संरक्षण यंत्रणेलाही अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
डिजिटल जनगणनेत तरुणांनी सहभागी व्हावे
देशाच्या अचूक विकासनियोजनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर मोदी यांनी भर दिला. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या जनगणनेत तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या कुटुंबाची माहिती अचूकपणे नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘राष्ट्र प्रथम’चा संदेश
स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्रनिर्मितीतील विविध महापुरुषांच्या योगदानाचा गौरव करत मोदी यांनी त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचे आवाहन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, बिरसा मुंडा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या महापुरुषांच्या विचारांचा संदर्भ देत ‘स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ’ या भावनेने प्रत्येक नागरिकाने कर्तव्य बजावावे, असा संदेश त्यांनी दिला.















