दहावी पुरवणी निकाल २०२६: २९.५३ टक्के निकाल; नाशिक विभागाने मारली बाजी

10th result of the state
दहावीचा निका

पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित केलेल्या इयत्ता १० वीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल (१४ जुलै २०२६)  अधिकृतपणे जाहीर केला. या परीक्षेचा एकूण निकाल २९.५३ टक्के लागला असून, परीक्षेस बसलेल्या ५१,३१३ विद्यार्थ्यांपैकी १५,१५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण २७.७५ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे.
दरम्यान,ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, अशा १८,४८२ विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्यामुळे ‘एटीकेटी’ सवलतीद्वारे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले असून, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे.

राज्य मंडळाच्या वतीने ही पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत यशस्वीपणे घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५२,८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने मंडळाने यावर्षी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. पात्र असूनही नियमित मुदतीत अर्ज भरू न शकल्यामुळे ज्या खाजगी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते, अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेत प्रविष्ट होण्याची विशेष संधी देण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आज दुपारी १.०० वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, शाळांना एकत्रित निकाल डाऊनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

अधिक वाचा  आमदारांचे संख्याबळ म्हणजे राजकीय पक्ष नव्हे; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा घणाघाती युक्तिवाद

विभागीय निकालाचा विचार करता, नाशिक विभागाने ४१.४५ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल नागपूर (३९.४२%), लातूर (३४.५५%), छत्रपती संभाजीनगर (३४.२७%), अमरावती (३०.३६%) आणि पुणे (२३.९९%) या विभागांचा क्रमांक लागतो. कोल्हापूर विभागाचा निकाल १८.५३% आणि मुंबई विभागाचा निकाल १७.७३% लागला असून, कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच १२.२६ टक्के लागला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घटल्याचे दिसून येते; कारण २०२४ मध्ये हा निकाल ३६.७८% आणि २०२५ मध्ये ३६.४८% इतका नोंदवण्यात आला होता.

या परीक्षेसाठी राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. भरारी पथकांच्या माध्यमातून गैरप्रकारांना आळा घालण्याचे कडक प्रयत्न करण्यात आले, ज्यामुळे तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली. तसेच, परीक्षेस बसलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सर्व आवश्यक सवलती देण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा  ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले : फडणवीसांचे विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान

निकालानंतरच्या प्रक्रियेसाठी मंडळाने सविस्तर वेळापत्रकही जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांना १५ जुलै ते २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये, तर छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क आकारले जाईल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून, ती मिळाल्यापासून पाच कार्यालयीन दिवसांच्या आत प्रति विषय ३०० रुपये शुल्क भरून अर्ज करावा लागेल. हे सर्व शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.

या परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारण्यासाठी ‘श्रेणी/गुणसुधार’  योजनेअंतर्गत पुढील सलग तीन संधी (फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ आणि फेब्रुवारी-मार्च २०२८) उपलब्ध राहतील. तसेच, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या नियमित परीक्षेसाठी पुनर्रपरीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी आणि आयटीआय द्वारे क्रेडिट ट्रान्सफर घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे राज्य मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांनी अभिनंदन केले असून, परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा  मुंबईचा महापौर  हा मराठीच  व्हायला हवा आणि तो होणारच : ठाकरे बंधूंचा एल्गार
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love