माझा मित्र गेला

लेख
Spread the love

खरं तर दोन दिवस उलटून गेले आहेत. दिलीप धारूरकर यांना संभाजीनगर मुक्कामी देवाज्ञा झाली. सहसा मला भावना व्यक्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण दिलीपचे जाणे आतुन गोठवून टाकणारे होते. इतक अनपेक्षित होते दिलीपचे जाणे कि प्रतिक्रिया सोडा, वस्तुस्थिती स्विकारण्यासाठी सुध्दा दोन दिवस कमी आहेत.

पण तरीही हे खरं आहे व म्हणून स्वीकारले पाहिजे. कारण या ख-याच्या शोधाचाच तर दिलीप वारकरी होता. मी नगर जिल्ह्यात प्रचारक व दिलीप पाटबंधारे खात्यात इंजिनिअर म्हणून नगरला आला. एकटाच होता. नावापुरती खोली होती पण खरा मुक्काम संघ कार्यालय नगर. मला किती झटपट मैत्री करता येते माहिती नाही पण दिलीपला मैत्री करण्यासाठी फक्त एक कटाक्ष पुरत असे. स्निग्ध नजर व निष्पाप चेहरा व आयुष्यभर जपलेला बाल सुलभ कुतुहूलाने भरलेला दिलीप ह्याला मित्र मिळवावे लागले नाहीत, तर त्या परिसाजवळ गेलात की मैत्री शिवाय काही होऊच शकत नव्हते. मी ही एक मित्र बनलो.

रात्री दिलीप येणार, बंद पडलेल्या कराड बॅंकेचे भागवत येणार व सात मजली हास्याचे फवारे उडणार. संघ कामावर गंभीर कृतीशील चर्चा होणार. काही काम निघाले कि दिलीप,भोंग, भागवत एकच वाक्य सांगणार करू हो उद्याच. नका काळजी करू. याचा अर्थ काम झाले.

नंतरच्या काळात वाॅर्डचा फेरफटका जो सर्व वर्तमानपत्रात अपरिहार्य काॅलम ठरला त्याचा जनक दिलीप उमरगेकरच होता. नगर संघाला याचा इतका फायदा झाला कि एकही ताकदवान व्यक्ती अस्पर्ष राहीली नाही. मी सांगावं दिलीप या माणसाची भेट घडव व त्यानी सांगायचं वेळ काढा या दोघांना भेटलच पाहिजे.

डॉ हेडगेवार जन्म शताब्दीचा पहिला प्रकट नगरपालिका कार्यक्रम देशात नगरला झाला. प्रसिध्दी करायचं ठरलं. व दिलीपचा झंझावात कामाला आला. रात्री ७ चा कार्यक्रम राजु गटणेने फोटो काढून लगेच डेव्हलप करायचे दिलीपने बातमी,फोटो caption तयार करायचं महेंद्र चंदेने ८ वा नगर सोडून पुण्याला निघायचं, पुणे तरूण भारत ने पहिल्या पानावर किती जागा सोडायची व झाल. मिनीट टु मिनिट योजना यश. हा होता माझ्यासाठी दिलीप.

संघ कामासाठी वाटेल ते म्हणजे खरोखरच वाटेल ते करायचा. नगर जिल्हा पिंजून काढला. रात्र रात्र तरूणांना भारावून टाकायचा. संघ कार्यालय एक दिवस ही ओस दिसायचे नाही. दिलीप येणार व चैतन्य जागवणार हे ठरलेले.

वैयक्तिक संबंध तर अव्यक्तच ठेवावे लागतील एवढे वैयक्तिक होते. सुख दुःख आनंद वैषम्य सर्व रस होते. सरकारी नोकरी सोडावी का? स्वान्त सुखाय जमणार असेल तरच सोड. लगेच म्हटला सोडली. पण यातील पुढील आयुष्यात याचे मोठे श्रेय वहिनींना जाते.

पण जरा तत्वज्ञान म्हणून. दिलीपने जांभेकर, टिळक आगरकर स्वरूपातील पत्रकारिता केली. एकारलेल्या विकृत विचारधारांसारखी नाही. सत्य स्विकारावे,पण माझे मत सत्य म्हणून स्विकारा असा कधीच आग्रह धरला नाही व त्यासाठी लबाडीपण केली नाही. पण याच कारण समजावून घेणे दिलीप समजण्यासाठी आवश्यक आहे.

हिंदूत्वाचा वारकरी होता व हिंदूत्वाची सर्वात योग्यतेच्या जवळची व्याख्या आहे Relentless pursuit of truth. सत्य शोधाचा अथक प्रवास. दिलीप त्याचाच वारकरी होता. म्हणून तो निर्भिडही होता व सत्यशोधक ही होता.

पण आता नाही. साठी हे काय जायचे वय आहे? पण त्यामुळे वय तरी कळले. कारण त्याने तर काळाला थांबवून ठेवले होते.

त्या चीरतरूण दिलीपला मनापासून श्रद्धांजली.

न सांगता सवरता प्रवासाला लाल डबा पकडायचास तसा हा निर्वाणाचा प्रवासही सुरू केलास. हरकत नाही.

पण तुझ्या आठवणी तर हिरावून नेल्या नाहीस.

आभार दिलीप धारूरकर.

सुनील देशपांडे

पुणे

९४२०४९५१३२

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *