अन्यायी आणीबाणीला पुरून उरलो हेच समाधान

महाराष्ट्र लेख
Spread the love

तब्बल ४५ वर्षे झाली. तेव्हा कळण्याचं फार वय नव्हतं, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादल्याची चर्चा सुरू होती. मी इयत्ता आठवीत शिक्षण घेत होते. वृत्तपत्र आणि आकाशवाणीच्या बातम्यात आणीबाणीचे गोडवे गायले जात होते.  आई आणि दादा या विषयावर चर्चा करत तेव्हा, त्यांच्या  बोलण्यातून काळजी व्यक्त व्हायची.

एक दिवस अचानक दाराशी पोलीस आले,  डॉक्टर दिनकर भिकाजी देशपांडे आहेत का म्हणून त्यांनी चौकशी केली. पोलीस का आले याचा आम्ही विचार करू लागलो. भेदरलेल्या  स्थितीत मोठ्या भावाने आत जाऊन दादांना पोलीस आल्याचे सांगितले ते धीरोदात्तपणे दाराशी आले. पोलिसांना आत या म्हणाले.  तुम्हाला पोलीस स्टेशनला आमच्यासोबत यायचे आहे, असे सांगून पोलिसांनी आत यायचे टाळले. घरातले वातावरण गंभीर झाले. आईच्या चेहऱ्यावरचे  हावभाव बदलल्याचे आमच्या नजरेतून सुटले नाही. आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी, मी आठवीला, मोठा भाऊ दहावीला, बाकी दोघे लहान, वडिलांना पोलीस का घेऊन गेले हे आम्हाला समजत नव्हते. आम्ही घाबरलो. मात्र आई सावरली आम्हाला ती सांगू लागली. तुमचे दादा चांगले काम करतात. पण इंदिरा गांधीना ते मान्य नसल्याने त्यांनी दादांना अटक केली.

दुसर्‍या दिवशी समजले सिन्नर शहर आणि तालुका मिळून नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर सर्वांना कोर्टात उभे करण्यात आले. वकील नानासाहेब लेले यांनी कार्यकर्त्यांना सोडुन द्यावे या साठी युक्तिवाद  केला. मात्र कोर्टाने नकार दिला. दहावीला असलेला माझा भाऊ राजेंद्र कोर्टात गेला होता, त्याने सगळी हकीकत आम्हाला सांगितली. दुसऱ्या दिवशी या सर्व नऊ जणांना नासिक रोड मध्यवर्ती तुरुंगात हलविण्यात आल्याचे कळले. तेव्हा आमच्या डोळ्या पुढे अंधारच पसरला. गावातले परिचित आणि शेजारचे लोकही आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पहायला लागले. कोणी फारशी विचारपूसही करेना,त्यावेळी मोबाईल आणि फोनही नव्हते. दुपारनंतर शहरातील अटक केलेल्या घरातील महिला एकमेकींकडे आल्या आणि एका ठिकाणी जमत परिस्थितीवर त्यांनी चर्चा केली. एकमेकींना धीर दिला. माझे वडील समाजसेवी डॉक्टर असल्याने सेवाभाव हाच त्यांचा पिंड होता. सहाजिकच घरातली आर्थिक परिस्थिती साधारण होती.मात्र आमची आई  तारा देशपांडे खंबीर व धीरोदात्त होती.  दुसऱ्याच दिवशी आमचे सख्खे एकुलते एक मामा राहुरी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर उपाध्ये यांनाही अटक झाल्याचे कळले. त्यांनाही नासिक रोड तुरुंगात आणल्याने आम्हाला थोडा दिलासा मिळाला. पण  अटक करण्यात आलेल्याचा नेमका गुन्हा काय? या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते.

आमची शाळा सुरू होती. शिक्षक आणि परिचित, वडिलांना झालेल्या अटक या विषयावर काही विचारत व बोलत नव्हते. वर्गातले मित्र मैत्रिणी मात्र यावर विचारणा करायचे. त्यावेळी आम्ही निरुत्तर असायचो. काही दिवसांनी घरात आर्थिक चणचण भासू लागली. शाळेची फी व अन्य चीजवस्तूसाठी ओढाताण होऊ लागल्याने आई काळजीत असायची. वडिलांकडे येणाऱ्या काही रुग्णांकडे  उधारीचे पैसे येणे बाकी होते. नाशिक रोड तुरुंगात वडिलांना भेटायला गेल्यावर त्यांनी ही यादी आईकडे दिली. त्यानुसार माझा भाऊ राजू या  लोकांकडे जाऊन निरोप देऊ लागला तसे या लोकांनी उधारीचे पैसे देण्यास सुरुवात केली त्याचा आधार  होऊ लागला. नंतर या वातावरणाला आम्ही सरावलो. बाकीचे लोकही सरावले. सिन्नर मधील संघाचे कार्यकर्ते सुमंत काका गुजराती व शरद जाखडी सर यांना अटक झाली नव्हती मात्र हे दोघे जण अधून मधून आमच्या घरी येऊ लागले. त्यांच्या हातात खाऊचा  पुडा असायचा.  जिल्ह्यातील संघ कार्यकर्त्यांनी काही आर्थिक जमवाजमव केली असून त्यातून तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी आर्थिक हातभार लावण्याचे ठरले.

नाशिक येथील दिवाकर मास्तर कुलकर्णी, रमेशदादा गायधनी हे ज्येष्ठ कार्यकर्ते अधून मधून घरी येऊ लागले त्यांच्याकडून शे-दोनशे रुपयांची आर्थिक मदत मिळाली. नाशिकरोड तुरुंगात सिन्नर येथील बापूसाहेब लेले डॉ. म. मो. सिनकर, दत्ता मुळे, वसंतराव फडके जे. डी. देशपांडे, नारायणराव गुजराती, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातले म. बा. आव्हाड, नामदेव दळवी हे कार्यकर्तेही वडिलांसोबत तुरुंगात होते. सर्वांना राजकीय बंदी म्हणून दर्जा देण्यात आल्याने खाणेपिणे व अन्य बाबतीत त्यांना चांगल्या सुविधा होत्या. आठवड्यातून एकदा त्यांना भेटण्याची आम्हाला मुभा होती. परंतु, भेटीसाठी जाण्याकरता आर्थिक भारही सोसवत नव्हता. अधूनमधून आम्ही भेटायला जायचो. त्यावेळी इतरांच्या निरोपाच्या चिठ्ठ्या पत्र आम्ही सोबत आणायचो व इतरांच्या घरी पोहोचवायचो. बाकीचे भेटायला जायचे त्यावेळी वडिलांचा निरोप व पत्र आम्हाला मिळायचे.

तुरुंगात असतानाच वडिलांना सायटिकाचा भयंकर त्रास सुरू झाला मात्र त्यावर नाशिक मध्ये उपचाराने बरे वाटत नसल्याने त्यांना मुंबईतील बोरीवली येथे डॉक्टर भगवती यांना दाखवण्यासाठी नेण्यात आले.  त्यांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितल्याने  खर्च करण्यापेक्षा त्यांची सुटका केलेली बरी असा विचार सरकारने केला असावा, तब्बल सात महिन्यांनंतर वडिलांच्या सुटकेच्या हालचाली सुरू झाल्या व वैद्यकीय कारणास्तव सुटका करण्यात आली. वडील घरी आले ते आजारी होऊनच. त्यामुळे घरातही  त्यांनी अंथरूण धरले. आम्ही सर्व काळजीत होतो. वडील घरी आले एवढेच काय ते समाधान. मात्र त्यांच्या हालचालीवर निर्बंध असल्याने घरातील परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. राहुरीचे मामा मात्र तुरुंगातच होते. त्यांच्याही घरी किराणा दुकान पाहण्यास कोणी नसल्याने व  उधारी घेणाऱ्यांनी दुकानाकडे पाठ फिरविल्याने व्यवसाय तोट्यात गेला. सुमारे दोन महिन्यांनी वडिलांना थोडे  बरे वाटू लागले. तसे त्यांनी तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाणे त्यांच्या अडीअडचणी साठी समन्वय साधणे असे सुरू केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

हळूहळू राजकीय वातावरण बदलू लागले आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे राहिले. निवडणुका जाहीर कराव्या लागल्या त्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. तुरुंगातील कार्यकर्त्यांची सुटका झाली यानंतर हे कार्यकर्ते व वडिलांनाही मानसन्मान मिळू लागला,सत्कार होऊ लागले.पण आणीबाणी कालावधीत आम्ही जे भोगले, भेदरलेल्या अवस्थेत दिवस कंठले आर्थिक अडचणीचे चटके सोसले, समाजाने एक प्रकारे बाजूला करणे, फारसा संपर्क न ठेवणे याचे कटू अनुभव सोसले. त्याचबरोबर देशासाठी त्याग करावा लागतो व त्याच्या वेदनाही सोसाव्या लागतात त्या आनंदाने सोसल्या पाहिजेत. हा संस्कारही आमच्यावर लहान वयातच झाला. खडतर परिस्थितीशी संघर्ष करण्याचे शिकलो.

देशभरातील  लाखो कार्यकर्त्यांना सरकारने अटक केली नसती तर सरकारवर आणि देशावर कोणते संकट कोसळले असते म्हणून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले? हा आम्हाला छळणारा प्रश्न आजही कायम आहे. समाजात सेवाभावी काम करणारे, स्वच्छ चारित्र्याचे, सरळमार्गी समाजसेवक अशी प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यांना विनाकारण गुन्हेगाराप्रमाणे पकडून तुरुंगात डांबण्यात आले. हे  बेकायदा कृत्य करण्याचे धाडस व लोकशाही पायदळी तुडविण्याचे पाप, इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाने कसे काय केले व तब्बल १९ महिने ते जनतेने कसे काय सहन  केले, हा विचार मनात आला की जिवाचा संताप होतो. लोकशाही मूल्य आणि त्यांचे गोडवे गाणारा काँग्रेस पक्ष, निरपराध कार्यकर्त्यांशी एवढ्या निष्ठूरपणे वागला. इंग्रजांनीही एवढ्या देशभक्तांना विनाकारण एवढ्या  दीर्घकाळ तुरुंगात ठेवले नसेल, तेवढा काळ काँग्रेसने या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले.लाखो कार्यकर्त्यांचे संसार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वाऱ्यावर सोडले.  अनेकांच्या  मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. अनेकांच्या वृध्द आई वडिलांचे औषध पाण्यावाचून हाल झाले. अनेकांचे नोकरी – व्यवसाय धुळीस मिळाले. कुटुंबातील सदस्यांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागला.  कारण १९ महिने हा काळ लहान नाही. अनेक तरुण कार्यकर्त्यांचे उमेदीचे दिवस तुरूंगात खितपत पडल्याने त्यांच्या आयुष्यातून वजा झाले. या सर्वच गोष्टीमुळे कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबियांना जे  नुकसान सोसावे लागले त्याचे मूल्यमापन करणेशक्य नाही.

मुळात लोकशाही पायदळी तुडवून काँग्रेसने भारतीय लोकशाहीला जी  काळीमा फासली त्याची कटू आठवण नकोशी असली तरी,  आजच्या पिढीला आणीबाणी काय होती, काँग्रेस पक्षाने ती का लादली? निरपराध कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांवर निष्ठूर अन्याय कसा केला याची माहिती तरुणाईला झा लीपाहिजे. कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांनी सोसलेल्या यातनांचे मोल नव्या पिढीला माहिती असले पाहिजे.

आणीबाणी कधी संपणार ? कार्यकर्ते कधी सुटणार? या प्रश्नांनी त्यावेळी घाबरायला होत असे. या ‘अंधार पर्वात’ आशेचा किरणही दिसत नव्हता. मात्र अनेक संघ कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून आणीबाणीच्या विरोधात जनतेला जागरूक केले. तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी संपर्क ठेवून त्यांना जमेल तशी मदत करून व मानसिक आधार देऊन त्यांचे कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला. या स्थितीतही त्यांनी न घाबरता केलेले कार्य दाद द्यावी असेच आहे. कितीही संकटे आली तरी संघाचे कार्यकर्ते धीर सोडत नाहीत. संकटातून मार्ग काढण्यासाठी चिकाटीने व धैर्याने प्रयत्न करत राहतात व यशस्वीही होतात. याचाच वस्तुपाठ कार्यकर्त्यांनी त्या वेळी उभा  केला. तो देशासाठी दीपस्तंभाप्रमाणे सतत मार्गदर्शन करत, प्रेरणा देत राहील.

—————————-

नीलिमा रवींद्र कुलकर्णी, नाशिक

मो. ९७६६०४२९७५

(लेखिका आणीबाणी मध्ये तुरुंगात असलेले सिन्नर (नाशिक) येथील ज्येष्ठ संघ कार्यकर्ते  डॉक्टर दिनकर

भिकाजी देशपांडे  यांच्या  ज्येष्ठ कन्या आहेत.)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *