मनसेच्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना अटक व सुटका; काय केलं होतंं रुपाली पाटील यांनी?


पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील वादग्रस्त  ‘जम्बो हॉस्पिटल’मधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी गेटवर चढून जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रवेश करून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली . मनसे स्टाईलने आंदोलन करत गेटवरून चढून त्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आज त्यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांना न्यायालयात  हजर करून १४ दिवस स्थानबद्ध करण्याची पोलिसांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावत  यापुढे अशा प्रकारे गुन्हे करणार नाहीत, या हमीवर त्यांची न्यायालयाने सुटका केली.MNS’s Rupali Patil-Thombre arrested and released

अधिक वाचा  #Amit Thackeray :‘बहिरोंको सुनाने के लीए धमाकेकी जरूरत है..' - अमित ठाकरे

यापूर्वी रुपाली पाटील यांच्यावर खडक, विश्रामबाग, हिंजवडी, बिबवेवाडी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शरीराविरुद्ध व दंगा मारामारीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्यामध्ये काही एक सुधारणा झाली नाही.  यापुढेही त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने त्यांना ८ ते २१ सप्टेंबरपर्यंत १४ दिवस स्थानबद्ध करण्याबाबत आदेश देण्याची न्यायालयाला विनंती पोलिसांकडून करण्यात आली होती.

तब्बल 86 कोटी रुपये खर्च करून पुण्यात हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात आले. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहेत. शिवाय पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यूही रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता.

अधिक वाचा  विरोधकांकडे नेता,नीती आणि नियत नाही- देवेंद्र फडणवीस : मुरलीधर मोहोळ यांचा शक्ति प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रूपाली पाटील-ठोंबरे, ऋषिकेश बालगुडे यांच्यासह अन्य मनसैनिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान सुरक्षारक्षक आत सोडत नसल्यामुळे रूपाली पाटील यांनी गेटवर चढून आत प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ इतरही कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला. शिवाजीनगर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

राजकीय कार्यकर्त्यांवर गुंडाविरोधात करायची कारवाई केल्याने त्याचा सोशल मिडियावर निषेध होऊ लागला होता. यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. राणे यांनी पोलिसांची कारवाई फेटाळून लावली. रुपाली पाटील यांच्याविरुद्ध अशाप्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले असले तरी त्यासाठी सीआर पीसी १५१ (३) ची कारवाई करणे योग्य होणार नाही. यापुढे अशा प्रकारे गुन्हे करणार नाहीत, असे हमीवर त्यांची न्यायालयाने सुटका केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love