का गेले महापौर मुरलीधर मोहोळ थेट जम्बो रुग्णालयात?

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड्स रुग्णसेवेत उपलब्ध होणार आहेत. शिवाय भेटीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत महापौरांनी विविध सूचनाही दिल्या आहेत.

जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते आणि सुविधा मिळत नाहीत, असे तक्रारींचे स्वरूप होते. म्हणूनच जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती नेमकी काय आहे? इथली यंत्रणा कशी आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी महापौर मोहोळ यांनी थेट जम्बो रुग्णालयात आढावा घेऊन विविध सूचना केल्या. आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असून समाधानाची स्थिती आहे. संबंधित एजन्सीवर कारवाईदेखील केली जाणार असून नव्या एजन्सीची नेमणूक केली आहे.

शहरात उपलब्ध असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची माहिती आणि उपलब्धता समजण्यासाठी प्रभावीपणे केंद्रीकरण करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय खासगी लॅब्सच्या बाबतीत दैनंदिन माहिती तातडीने वॉर्ड ऑफीसमध्ये नोंदवून रुग्णांशी संपर्क साधण्याची यंत्रणा राबवण्यची सूचना दिली गेली आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘ जम्बोत आताच्या घडीला १७८ रुग्ण उपचार घेत असून यापैकी काही रुग्णांना भेटून त्यांच्याशी सोई-सुविधा आणि उपचारांबद्दल चर्चा केली. यावरून रुग्णांमध्ये समाधान असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. याआधी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यावर आपल्या सुचनेनुसार दिवसातून तीन वेळा नातेवाईकांना संपर्क साधता येण्याची सुविधा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपलब्ध केली असून नातेवाईकांना सद्यस्थितीची माहिती दिली जाते. उपलब्ध औषधे आणि एम्ब्युलन्स याचाही माहिती घेतली आहे. शिवाय रुग्णांना दिलं जाणाऱ्या जेवणाचीही स्थिती स्वतः समजून घेतली. एकूणच परिस्थिती स्थिरावत असल्याचे चित्र आहे’.

‘येत्या दोन दिवसांत आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार असून आयसीयू बेड्सची संख्या ६० पर्यंत नेण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु होत आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बैठक घेऊन विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही महापौरांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *