पुणे : घोड्यांची अतिशय देखणी आणि लढाऊ अशी स्वदेशी प्रजात असणारे मारवाडी घोडे पाहण्याची संधी पुण्यातील अश्वप्रेमींना मिळणार आहे. निमित्त आहे, इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘मारवाडी हॉर्स शो’ या स्पर्धेचे. ही स्पर्धा रेसकोर्स येथे शनिवार,२५ फेब्रुवारी आणि रविवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. स्पर्धेचे यंदा ७ वे वर्ष असणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.घोडय़ांच्या वयोगटानुसार सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये मिल्क टीथ फिली, मिल्क टीथ कोल्ट, टू टीथ फिली, टू टीथ कोल्ट, मेअर अँड स्टॅलिअन या प्रकारातील नर आणि मादी अश्वांचा समावेश असणार आहे. देशभरातून जवळपास १०० हून अधिक अश्व या स्पर्धेत सहभागी होणार असून महाराष्ट्रासहित पंजाब, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून हे अश्व येणार आहेत. विभागानुसार, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अश्वांना रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
याविषयी माहिती देताना इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय नेन्सी म्हणाले, “ मारवाडी अश्व हे देखण्या स्वरूपातील भारतीय प्रजातीतील घोडे असून, लढाईतील निष्ठा आणि शौर्य यासाठी ही प्रजात ओळखली जाते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्याकडील अश्वांच्या प्रजाती भारतात आणून, त्यांना अधिक महत्व दिले. त्यामुळे साहजिकच भारतीय प्रजातीतील या घोड्यांचे जतन व संवर्धन कमी झाल्याने, दिमाखदार अशा मारवाडी अश्वांची प्रजाती मागे पडली. आता भारतात या मारवाडी प्रजातीच्या घोडय़ांचे जतन आणि पालनपोषण करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच आम्ही गेली सहा वर्षे मारवाडी हॉर्स शो चे आयोजन करत आहोत. त्याला नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच गेल्या काही वर्षात मारवाडी घोड्यांचे पालनपोषण करण्याकडे कल वाढल्याने त्यांची संख्यादेखील वाढली आहे.