पुणेः- पुणे महानगर पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीतर्फे महिलांसाठी ‘ बोला मनातलं’, ‘भन्नाट शाळा’ आणि ‘बेडसाईड केअर गिव्हर्सचे प्रशिक्षण’ असे तीन उपक्रम राबविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या या समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. महिला आणि बालकल्याण समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
कोविड आणि त्यामुळे आलेल्या लाँकडाउनच्या काळात कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर महिलांच्या अडचणी आणि समस्यांवर तात्काळ उपाय शोधणे तसेच त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे असल्याने पुणे महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीतर्फे हे तीन अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यातील ‘बोला मनातलं!’ उपक्रम “सार्थक वेल्फेअर फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. यासाठी सोमवार ते शनिवार या कालावधीत संध्या पाटील 8275268164, रश्मी पटवर्धन – 7499776322, करुणा मोरे – 9860260301 आणि सीमंतिनी गोखले – 9764560616 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
यातील दुसरा उपक्रम ‘भन्नाट शाळा’ हा असून त्याद्वारे महानगर पालिकेच्या शाळेतील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना श्राव्य कार्यक्रम ऐकविण्यात येणार आहेत. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची समाजातील महिलांप्रती योग्य ती मानसिकता घडविण्यासाठी हे कार्यक्रम उपयोगी पडणार आहेत. डॉ.सायरस पुनावाला यांच्या अर्थसाह्यातून ‘अँबी क्रिएशन्स’ ने या कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.
तर समाजाच्या दोन गरजा एकाचवेळी भागविण्याची क्षमता असलेल्या ‘कर्नल्स क्यूब’ संचालित, बेडसाईड केअर गिव्हर्सच्या प्रशिक्षणाचा महिला सक्षमीकरणाच्या प्रशिक्षणात समावेश करण्यात येणार आहे. त्याव्दारे ९ वी ते १२ वी पास किंवा नापास मुलींना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणा नंतर रोजगार उपलब्ध होईल. एकेकट्या राहणाऱ्या वृद्धांना तसेच रुग्णांना यातून दिवसभर त्यांची काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित मदतनीस मिळतील. असा या उपक्रमाचा दुहेरी फायदा आहे, अशी माहिती पुणे महानगर पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी दिली.