पुणे – विनोदी कविता, राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या, त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला लावणारे सध्याच्या राजकारणातील वास्तव, सामान्य माणसांच्या मनातील खदखदनाऱ्या प्रश्नांवर केलेल्या रचना, श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत केलेले सूत्रसंचालन यामुळे ३५व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे हास्यधारा हे मराठी कविसंमेलन गाजले.
ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, डॉ. महेश कोळुस्कर, नितीन देशमुख, नारायणपुरी, प्रशांत मोरे, अंजली कुलकर्णी, वैभव जोशी, हर्षदा सुखटनकर, प्रशांत केंदळे, भरत दौंडकर, नीलिमा मानगावे या कवींनी या संमेलनात सहभाग घेतला.
डॉ.महेश कोळुस्कर यांनी
पुढे पुढे दिवस आणखी कठीण येतील..
कवींना सुचणार नाहीत कविता..
लेखक, लेखिका ठेवू लागतील
वाङ्मयाशी फक्त वाङ्मयबाह्य संबंध..
या 15 वर्षांपूर्वी केलेली कवितेतून व्यक्त केलेले मत आता सर्वच क्षेत्रात तंतोतंत कसे खरे ठरत आहे यावर प्रकाश टाकला. त्याला प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावले.
प्रशांत मोरे यांनी सादर केलेल्या
बोलती आया बाया ग…आया बाया ग
नव्या लढाईच्या लढाया ग..
या कवितेला रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली.
नीलम माणगावे यांनी ,’प्रजासत्ताक दिन असाही कामी आला’, या आजच्या राजकीय आणि शिक्षण क्षेत्राबाबत वास्तव मांडणारी रचना सादर केली. त्याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नितीन देशमुख यांनी सादर केलेल्या
जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छाती वरती..
प्रश्न सांगतो आभाळाला, उत्तर मातीवरती..
पहिला पाऊस..पहिली धारा.. मनमन पुलकित होते..
असे वाटते.. कोणी सोडले..अत्तर माती वरती
या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली.
अंजली कुलकर्णी यांनी ‘लपवा छपवी’ ही उपरोधिक कविता सादर केली. प्रशांत केंदळे यांनी निसर्ग कविता सादर केल्या. वैभव जोशी यांनी ‘ओळख परेड’ आणि ‘डावा – उजवा’ या कविता सादर केल्या.
भरत दौंडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सादर केलेल्या ‘ अंदाज येत नाही’ या रचनेला रसिकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी सादर केलेल्या ‘कशाचाच काही संबंध नाही’ या विनोदी रचनेला प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करत ” वन्समोअर’ केले. नारायण पुरी आणि हर्षदा सुखटणकर यांनीही कविता सादर केल्या.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अभय छाजेड, चंद्रशेखर दैठणकर, सचिन साळुंके यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतुल गोंजारी, मोहन टिल्लू आणि श्रीकांत कांबळे उपस्थितीत होते.