गौरी गणपती साहित्य जत्रेचे दि. २७ ऑगस्ट रोजी उद्घाटन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन दि. २७ ते दि. ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कॉंग्रेस भवनचे पटांगण येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम करणार असून याप्रसंगी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आणि अभिनेत्री आरती शिंदे उपस्थित राहणार आहेत. याचे संयोजन पायल तिवारी बिटीया फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गौरी गणपतीनिमित्त सर्व संबंधित वस्तूंची खरेदी “वाती ते मूर्ती” सर्व एकाच छताखाली करता यावी, त्यात दर्जेदारपणा व माफक किंमत असावी आणि महिलांना रोजगार मिळावा या हेतूने या साहित्य जत्रेचे गेले १५ वर्षांपासून आयोजन करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे १३वे वर्ष आहे. यामध्ये सुमारे ७० ते ८० स्टॉल असणार असून महिला बचत गटांच्या स्टॉलला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत असलेल्या बचत गटांना समाविष्ट केले जात असते. या साहित्य जत्रेमध्ये गौरी गणपती मूर्ती, आरतीचे साहित्य, गौरीचे दागिने, मखर व अन्य आरास यासाठी आवश्यक साहित्य त्याचबरोबर मोदक, फराळ व प्रसादाचे पदार्थ, साहित्य व वस्तू आदी रास्त दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला नाही परंतु त्या मागील वर्षी झालेल्या गौरी गणपती साहित्य जत्रेत २१ लाख रुपयांहून अधिक विक्री झाली होती. यावर्षी देखील या महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा गौरी गणपती साहित्य जत्रा महोत्सवाच्या आयोजिका संगीता तिवारी यांनी व्यक्त केली. ज्या बचत गटांना व व्यावसायिकांना साहित्य जत्रेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे संपर्क साधावा तसेच नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *