पुणे- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल केल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा समाजामध्ये या निर्णयामुळे असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी, नवी पेठ येथे एकत्र येत,“एक मराठा… लाख मराठा”,”छत्रपती शिवाजी महाराज की जय”,”या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,” “कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय,” अशा घोषणा देत आपला असंतोष व्यक्त केला. तसेच या निर्णयाला सर्वस्वी राज्य सरकार असल्याचा आरोपही करण्यात आला.
या निर्णयानंतर पुण्यात नवी पेठ येथे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी यांनी काळ्या फिती बांधुन मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या निर्णयाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे , धनंजय जाधव, तुषार काकडे , रघुनाथ चित्रे , बाळासाहेब आमराळे सहभागी झालेत. तर सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले .
राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे.