मान्सूनचे पुनरागमन: २४ जूनपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्र मान्सून अपडेट (Maharashtra Monsoon Update)
महाराष्ट्र मान्सून अपडेट (Maharashtra Monsoon Update)

पुणे(प्रतिनिधी)–राज्यात गेल्या १२ दिवसांपासून एकाच जागी स्थिरावलेला मान्सून अखेर आपली वाटचाल पुन्हा सुरू करणार असून २४ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

८ जून रोजी दक्षिण कोकण, सातारा आणि सोलापूरपर्यंत धडक दिलेला मान्सून अचानक रेंगाळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि असह्य उकाडा वाढला असून, यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या संकटात सापडल्या आहेत. या खंडामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा डोळे लावून बसला आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार, मान्सूनच्या या विलंबामागे प्रामुख्याने तीन मोठी तांत्रिक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांना पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली आर्द्रता (मॉइश्चर) आणि वेग कमी झाला आहे. दुसरे कारण म्हणजे ‘एल निनो’चा प्रभाव, ज्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास अडथळे येत आहेत आणि तिसरे कारण म्हणजे वायव्येकडून येणारे कोरडे व उष्ण वारे, ज्यामुळे मुंबईसह राज्यात तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. सद्यस्थितीत देशात १८ जूनपर्यंत सरासरीपेक्षा ३८ टक्के कमी पाऊस झाला असून महाराष्ट्रात पावसाची तूट तब्बल ७८ टक्क्यांवर पोहोचली आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये ६० ते ९९ टक्के तूट असून धुळे, नंदुरबार आणि ठाणे या जिल्ह्यांत तर १०० टक्के तूट म्हणजेच अजिबात पाऊस झालेला नाही.

अधिक वाचा  जरांगेसाहेब आरक्षण घेतल्याशिवाय हटू नका.... : मराठा आरक्षण आंदोलकाची आत्महत्या

तथापि, आता निसर्गाने आपली चाल बदलण्यास सुरुवात केली असून २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे सक्रिय होत असून ‘सोमाली जेट स्ट्रीम’ पुन्हा वेग घेणार आहे. तसेच ‘मॅडन जुलियन ऑसिलेशन’ (एमजीओ) ही प्रणाली पुढील आठवड्यात वेगाने फेज दोन ते पाच मधून पुढे सरकणार असल्याने राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २५ जून ते १ जुलै दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असून यादरम्यान ओडिसा, झारखंड, बिहार आणि गुजरातच्या काही भागातही तो पोहोचेल.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी हवामान खात्याने विशेष इशारा दिला असून २५ ते २८ जून दरम्यान या पट्ट्यात अतिवृष्टीचे ढग सक्रिय राहतील आणि धुवाधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल. कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असला, तरी उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली मोठी तूट जून अखेरपर्यंत पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचेही हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  अभिरुचीसंपन्न हिंदी चित्रपट संगीत सर्वसमावेशक

मान्सून रेंगाळल्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या असून उन्हामुळे जलाशयातील पाणीसाठाही झपाट्याने घटत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जमिनीत पेरणीयोग्य दमदार पाऊस होऊन पुरेशी ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा बियाणे वाया जाण्याची भीती आहे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. २४ जूननंतरच्या पावसाची स्थिती पाहूनच पुढील निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love