दिलासादायक : दाते पंचांग २०२६ नुसार कसा असेल मान्सूनचा अंदाज?

दाते पंचांग पावसाचा अंदाज २०२६ (Date Panchang Monsoon Forecast 2026)
दाते पंचांग पावसाचा अंदाज २०२६ (Date Panchang Monsoon Forecast 2026)

पुणे- सध्या राज्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सामान्य नागरिक चिंतेत असतानाच, दाते पंचांग २०२६ ने पावसाबाबत दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. मृग नक्षत्रातील पावसाचा खंड हा पंचांगाच्या नियोजित चक्राचाच एक भाग असून, खऱ्या अर्थाने पावसाची दमदार सुरुवात २२ जूनपासून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या या लहरीपणामुळे न डगमगता निसर्गाच्या या चक्रावर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंचांगानुसार, ७ ते २१ जून या मृग नक्षत्राच्या काळात पावसाचा खंड राहील असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता, जो सध्या तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. मात्र, येत्या २२ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २६ मिनिटांनी ‘आर्द्र’ नक्षत्राचे आगमन होत असून, या नक्षत्राचे वाहन ‘गाढव’ आहे. या नक्षत्राच्या प्रभावामुळे २२ जूनपासून पावसाचे आगमन निश्चित मानले जात आहे. विशेषतः २२, २३, २५, २६ आणि २९ जून या तारखांना राज्यात चांगल्या पावसाचे योग असून पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.

अधिक वाचा  “कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर अधिक वाढून तो स्थिरावणार असल्याचे पंचांगात नमूद केले आहे. ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी ‘पुनर्वसू’ नक्षत्राचा प्रवेश होईल. या नक्षत्राचे वाहन ‘घोडा’ असल्याने पाऊस अत्यंत वेगाने सर्वदूर पसरणार आहे. विशेषतः १३ ते १९ जुलै या कालावधीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून, यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन ती भरण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाचा खरा रौद्र अवतार जुलैच्या उत्तरार्धात पाहायला मिळण्याचे संकेत आहेत. २० जुलै रोजी सकाळी ११ वाजून २८ मिनिटांनी ‘पुष्य’ नक्षत्राची सुरुवात होईल. या नक्षत्राचे वाहन ‘उंदीर’ असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचे संकेत देण्यात आले आहेत. या काळात पावसाचा जोर प्रचंड असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.

अधिक वाचा  एल-निनो आणि ला-निना: भारतीय मान्सूनची चक्रीय प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व

या संपूर्ण पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी पंचांगाने अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिली असली तरी, पावसाच्या आगमनानंतर लगेचच पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीच्या पोटापर्यंत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही. निसर्गाचे हे चक्र पंचांगातील अंदाजानुसारच फिरत असून २२ जूनपासून वरुणराजाची कृपादृष्टी नक्कीच लाभेल, असा दिलासा दाते पंचांगाद्वारे देण्यात आला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love