७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार

योगेश देशपांडे राष्ट्रीय पुरस्कार (Yogesh Deshpande National Award)
योगेश देशपांडे राष्ट्रीय पुरस्कार (Yogesh Deshpande National Award)

पुणे(प्रतिनिधी)– भारतीय सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (२०२४) घोषणा आज नवी दिल्ली येथे करण्यात आली असून, यामध्ये लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचा मला अत्यंत आनंद, समाधान आणि अभिमान वाटतो. भारतभरातील असंख्य उत्कृष्ट चित्रपटांमधून माझ्या लेखनाची दखल घेतली गेली, हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे असल्याची भावना योगेश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

हा पुरस्कार एका दिवसाचा किंवा एका चित्रपटाचा नाही. हा गेल्या चार वर्षांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचा, संशोधनाचा, संयमाचा आणि प्रामाणिक मेहनतीचा गौरव आहे. बाबूजी म्हणजेच स्वरगंधर्व सुधीर फडके यांचं आयुष्य समजून घेण्यासाठी मी त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक भेटी घेतल्या, त्यांच्या आठवणी ऐकल्या, उपलब्ध साहित्य, ऐतिहासिक संदर्भ आणि संगीताचा सखोल अभ्यास केला. त्यांचा प्रवास केवळ माहिती म्हणून नव्हे, तर भावनिक आणि मानवी स्तरावर पडद्यावर जिवंत करण्याचा माझा प्रयत्न होता असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  सुप्रसिध्द संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पटकथा लिहिताना माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं की, हा चित्रपट पारंपरिक चरित्रपट न राहता प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करणारा सिनेमॅटिक अनुभव व्हावा. प्रत्येक पात्राची उभारणी, प्रत्येक प्रसंगामागचा भावार्थ, कलाकारांची निवड, संगीताची मांडणी, संवाद, नाट्य आणि दृश्यरचना यावर आम्ही अत्यंत बारकाईने काम केलं. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हीच माझी सर्वात मोठी जबाबदारी आणि प्राथमिकता होती.

माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, प्रेक्षकांना टीबाहेरचा, प्रामाणिक आणि दर्जेदार सिनेमा द्यावा. बाबूजींच्या आयुष्यातील ज्ञात घटनांबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावविश्व, त्यांच्या संघर्षाची खोली आणि त्यांच्या संगीतामागची माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता पडद्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न या पटकथेत केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा राष्ट्रीय पुरस्कार मी माझ्या आई-वडिलांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या संपूर्ण टीमला, चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांना, निर्मात्यांना, फडके कुटुंबीयांना आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला समर्पित करतो. राष्ट्रीय पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, तो पुढील प्रवासाची जबाबदारी वाढवणारा विश्वास आहे. यापुढेही भारतीय संस्कृती, इतिहास आणि समाजाशी जोडलेल्या कथा अधिक संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि जागतिक दर्जाच्या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा माझा प्रयत्न कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love