पुणे- प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना अंत: करणात ठेवाव्यात, घरात ठेवाव्यात. धार्मिक भावनांचं जाहीर प्रदर्शन करु नये. त्याच्या आधारावर अन्य घटकांच्या संबंधी एकप्रकारचा द्वेष निर्माण होऊन त्याचे परिणाम समाजावर दिसू लागतात. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं,” अशी खंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.
अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात सत्ताधारी – विरोधक यांच्यावरील टीका ही भाषणापुरती मर्यादित होती. ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरु होती. विधीमंडळात अनेक वेळा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील चर्चा टोकाची होती. पण ही चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हितासंबंधी विचार करत असत, ही महाराष्ट्राची परंपरा होती.
“मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे इतके जाहीर मतभेद असायचे की एकमेकांबद्दल शब्द वापरताना आम्ही कधी काटकसर केली नाही. पण ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेक वेळा औरंगाबादला सभेत आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. पण ती सभा संपल्यानंतर त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आमची संध्याकाळ जायची. सभेत काय बोललो याचं स्मरणही कधी व्हायचं नाही.
पण, दुर्दैवाने महाराष्ट्रात अलिकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री ही संस्था आहे, या संस्थेचा मान ठेवला पाहिजे असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लगावला.
किरीट सोमय्या यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही शरद पवार यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अस्वस्थ असलेल्या लोकांनी कुठले कुठले मार्ग उपलब्ध आहेत, त्याच्या खोलात जाणार. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवटीची दमदाटी केली जाते, त्याचे परिणाम होत नाही. निवडणुकीची वेळ आली तर त्याचे काय परिणाम होतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे, त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असं वाटत नाही”. असा चिमटाही त्यांनी काढला.