का पडतो वळवाचा पाऊस? : राज्यनिहाय वेगवेगळ्या नावाने हा पाऊस कसा ओळखला जातो

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- एप्रिल-मे महिन्यात उन्हाळा तर असतोच परंतु, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वळवाचा पाऊस पडतो तर काही वेळा वादळी वारे वाहतात. पण, हा पाऊस उन्हाळ्यात का पडत असेल? त्यामागची कारणे काय आहेत? हे समजून घेतानाच या पावसाला निरनिराळ्या राज्यात वेगवेगळी नावे काशी आहेत आणि कशामुळे आहेत याचेही कारण वैशिष्ट्यपूर्ण आहे.

महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वाधिक पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांच्या काही भागात 100 ते 130 मि. मी. दरम्यान पडतो. दक्षिण मराठवाडा, पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण 25 ते 50 मि. मी. आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भागात 50 ते 75 मि. मी. पावसाचे प्रमाण आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही तालुक्यांत 70 ते 100 मि. मी. पावसाचे प्रमाण आहे.

राज्यनिहाय वेगवेगळ्या नावाने हा पाऊस ओळखला जातो. महाराष्ट्रात त्याला “आम्रसरी’ किंवा वळवाचा पाऊस म्हणतात. हा पाऊस आंबा पिकास मानवतो म्हणून त्याला “आंबेसरी’ असेही म्हणतात. मेच्या शेवटी व जूनच्या प्रारंभी केरळ व कर्नाटक राज्यांत पडणारा वादळी पावसास “चेरी ब्लॉसम’ पाऊस म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये या पावसास “नॉर्वेस्टर’ असे म्हणतात. हा कॉफी पिकासाठी उपयुक्त असल्याने त्यास “कॉफी बहार सरी’ असेही म्हणतात. तर उत्तर प्रदेशमध्ये “आँधी’ या नावाने ओळखला जातो.

गंगेच्या मैदानात पश्चिम बंगालमध्ये मार्चमध्ये मोसमीपूर्व वाहणाऱ्या उष्ण वादळी हवेच्या प्रवाहांना “कालबैसाखी’ म्हणतात. यामुळे धुवाँधार पर्जन्यवृष्टी होते. तर, बिहार, उत्तर प्रदेश राज्यांत ताशी 40 ते 50 किमी प्रति तास या वेगाने वारे वाहतात. धुळीने आच्छादलेल्या वाऱ्यांना “लू’ असे म्हणतात. हे वाहणारे अतिउष्ण व कोरडे वारे असतात. यामुळे या प्रदेशांत बऱ्याच वेळा धुळीचे लोट उडतात. देशाच्या विविध भागांत एप्रिल ते मे या काळात पाऊस पडतो. तोच आपल्याकडे वळिवाचा पाऊस म्हणून ओळखला जातो.

पाऊस पडण्यासाठी वारा म्हणजेच हवा हाच महत्त्वाचा घटक आहे. वाऱ्यांमुळे पृथ्वीच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे उष्णता, आर्द्रता आणि अन्य बाबींचे वहन होते. भूपृष्ठावर जे वारे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात म्हणजे ऋतुमानानुसार आपल्या प्रवाहाची दिशा बदलतात अश्या वाऱ्यांना “मोसमी वारे’ असे म्हणतात. मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीवर भूभाग आणि जलभागाच्या तापमानातील फरक, आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रिभवण पट्टा स्थानबदल, एल-निनो आणि ला-निनासारख्या घटकांचा प्रभाव पडतो.

पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे दोन भाग आहेत. उन्हाळ्यात उत्तर गोलार्धात कर्कवृत्तावर सूर्यकिरणे कमी-जास्त प्रमाणात लंबरूप पडतात. त्यामुळे मध्य आणि आग्नेय आशियासह भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये तापमान जास्त असते. यामुळे मध्य आशियामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. याच काळात हिंदी महासागर आणि लगतच्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात तुलनात्मकरित्या शीत आणि हवेचा जास्त दाब विकसित होतो. या कमी दाबाच्या प्रदेशाकडे दक्षिणेकडील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. हे वारे समुद्रावरुन जमिनीकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना “खारे वारे’ असेही म्हणातात. हे बाष्पयुक्त वारे महासागरावरून वाहताना मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणतात आणि भूपृष्ठावरून वाहताना वरच्या दिशेने जातात. त्यामुळे वारे जसंजसे वर जातात तसे त्यांची बाष्पधारण क्षमता कमी होते. वाऱ्यातील बाष्पाचे घनरूप पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडतो.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *