मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा

शिक्षण
Spread the love

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य जपणारे क्रीडाप्रकार आणि खेळणी तयार करावीत, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘खेल खेल में’ : टॉय अँड गेम डिझाईन स्पर्धा (Online) आयोजिली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन येत्या रविवारी (दि. १ नोव्हेंबर २०२०) रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतीय विद्या भवन, पुणे केंद्राच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, तो ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. स्पर्धेविषयी आणि शैक्षणिक मालिकेविषयीची सर्व माहिती www.kkm.exploratory.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी विज्ञान शोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालक नेहा निरगुडकर, समन्वयक अभिषेक अनगोळे, रजत अगरवाल आदी उपस्थित होते. 

नंदकुमार काकिर्डे म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टी व्हर्च्युअल होत आहेत. शिक्षणही ऑनलाईन झाले आहे. अशातही मुलांच्या डोक्यात अनेक नवकल्पना घोळत असतात. शाळेचे उपक्रम, प्रकल्प करताना मुले त्याच्यात रमतात. मुलांच्या सर्जनशीलतेला आव्हान देण्यासाठी ‘खेल खेल में’ ही एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत खेळणी, विविध गेम्स आणि प्रकल्प विद्यार्थी बनवू शकतात. भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, ऐतिहासिक किंवा भौगोलिक संकल्पनेवर आधारित खेळणी, गेम्स आणि प्रकल्पांची नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि मेंदूला खुराक देणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे. नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना संस्थेच्या वतीने सहकार्य केले जाणार आहे.”

अनंत भिडे म्हणाले, “ही स्पर्धा प्रामुख्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन गटात होणार आहे. कनिष्ठमध्ये ५ वी ते १० वी, तर वरिष्ठमध्ये ११ वी व त्यापुढील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा दोन टप्प्यात पार पडेल. पहिला टप्पा संकल्पनेचा असून, त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पना स्पर्धेसाठी पाठवाव्या लागतील. त्याची अंतिम तारीख आहे १० डिसेंबर आहे. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त रूप द्यायची आहे. त्यासाठीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२१ अशी आहे. सर्व सहभागी खेळणी आणि गेम्सचे ऑनलाईन प्रदर्शन राष्ट्रीय विज्ञान दिवशी अर्थात २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑनलाईन स्वरूपात भरवण्यात येईल. स्पर्धेतील विविध विभागात दोन लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.”

नेहा निरगुडकर म्हणाल्या, “या स्पर्धेच्या निमित्ताने २० नोव्हेंबरपासून शैक्षणिक मालिका सुरू केली जाणार आहे. ही मालिका सर्वांसाठी मोफत असेल. त्यामध्ये विविध ऑनलाईन अभ्यासक्रम, कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने असतील. या मालिकेतून गेम डिझाईन, विचार कौशल्य, खेळण्यांची निर्मिती, फ्रॅब्रिकेशन तंत्रज्ञान, प्रोग्रामिग, इलेक्ट्रॉनिक आदी विषयांचे शिक्षण मिळेल. समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांना मोफत सल्ला आणि विद्यार्थी- शिक्षक संवादांचे आयोजन केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक यांनी या संधीचा लाभ घ्यावा.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *