महाराष्ट्रातून पहिल्यांदा शोधलेल्या बेडकाला मिळाली ओळख

पुणे-मुंबई
Spread the love

पुण्यातील संशोधकांनी ‘क्रिकेट फ्रॉग’ च्या एका १०० वर्षांपूर्वी शोधलेल्या प्रजातीची ओळख पटवली. महाराष्ट्रातून ‘फेजेर्वर्या सिहादरेन्सिस’ या बेडकांचा शोध स्कॉटलंड मधील प्राणिशास्त्रज्ञ थॉमस नेल्सन अन्नंदाले यांनी स्वातंत्र्य -पूर्व काळात १९१९ साली खंडाळा (पुणे) येथून लावला होता. त्याचा रंग व आकारमानामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे शास्त्रज्ञांना त्याची ओळख पटवण्यास अडचणी येत होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ. समाधान फुगे व झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मधील डॉ. के. पी. दिनेश यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या संशोधकांनी पुणे व उत्तर-पश्चिम घाटातील ‘क्रिकेट फ्रॉग’ वर्गातील बेडकांचा अभ्यास करून असे अनुमान काढले कि, ‘फेजेर्वर्या सिहादरेन्सिस’ या बेडकांचा रंग व आकार इतर बेडकांशी मिळता जुळता आहे. त्यांनी या बेडकाच्या जनुकांचा, आवाजाचा व आकारमानाचा अभ्यास करून या बेडकाची ओळख पटवली. अभ्यासकांनी हे संशोधन नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय ‘झुटेक्सा’ या न्यूझीलंड येथून प्रकाशित होत असलेल्या नियतकालिका मध्ये प्रसिद्ध केले.

या अभ्यासासाठी संशोधकांनी संपूर्ण पश्चिम घाटामधून फेजेर्वर्या सिहादरेन्सिस बेडकांचे नमुने गोळा केले व त्यांना असे आढळून आले की, हा बेडूक पश्चिम घाटामध्ये वेगवेगळ्या रंगरूपांमध्ये अस्तित्वात आहे. यापूर्वी या बेडकाचे जनुकीय नमुने उपलब्ध नसल्याकारणाने त्यांची ओळख पटवता येत नव्हती, यामुळे त्यांच्या उत्क्रांती व त्यांचा आढळ किंवा वावर याबद्दल कोणतेही अनुमान काढता येत नव्हते. ‘फेजेर्वर्या सिहादरेन्सिस’ हा बेडूक संपूर्ण भारतीय उपखंडात अस्तित्वात असण्याची शक्यता डॉ. दिनेश (झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया) यांनी व्यक्त केली. या संशोधनामुळे बेडकांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय माहितीचा खूप उपयोग होतो यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले.

जनुकीय माहिती उपलब्ध नसल्याकारणाने व हा बेडूक पश्चिम घाटातील वेगवेगळ्या ठिकाणी विविध रंगरूपात वावरत असल्याकारणाने २००५ साली हाच बेडूक दक्षिण भारतातून जपानी व भारतीय संशोधकांनी दुसऱ्या नावाने प्रसिद्धीस आणला होता. पुण्यातील संशोधकांच्या प्रयत्नांमुळे या बेडकाला पुन्हा जुनी ओळख मिळाली आहे.

या संशोधनातील आश्चर्यकारक बाब म्हणजे हे बेडूक इतर प्रजातीच्या (‘फेजेर्वर्य ऍग्रिकोला’) बेडकांशी समागम करून संकरित पिल्ले जन्माला घालतो. परंतु अशी संकरित पिल्ले निसर्गात जगू शकत नाहीत. या दोन्ही बेडकांचे नर व माद्या एकाच वेळी एकाच ठिकाणी समागमासाठी एकत्र येतात. ‘फेजेर्वर्या सिहादरेन्सिस’ हा बेडूक किरकिरा आवाज करतात म्हणूनच त्यांना ‘क्रिकेट फ्रॉग’ (रातकिडा बेडूक) म्हणतात. समागमाच्या वेळी मादा बेडकाला आकर्षित करण्यासाठी सर्व नर बेडूक एकत्र येऊन गोंगाट करतात, अशी माहिती डॉ. समाधान फुगे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *