मुंबई—खान्देशातील भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटतं असे सांगतानाच त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले. कोणी किती भूखंड घेतले? यांचे लवकरच पत्ते खोलणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यापुढे फडणवीस- खडसे यांचा कलगीतुरा चांगलाच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
खान्देशात ज्या पद्धतीने भाजपा वाढवला त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढवू असे ते म्हणाले. गेले ४० वर्षे राजकारणात आहे मात्र, कधीही महिलेला समोर ठेवून राजकारण केले नाही, तो माझा स्वभाव नाही असा टोला त्यांनी लगावला. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले .