पुणे– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले मला एक कळत नाही, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जल्लोष साजरा करत गुलाल उधळला गेला, पेढे वाटले गेले मग कालचा जो हल्ल्याचा प्रकार झाला तो कोणाच्या सांगण्यावरून झाला? हे सर्व घडत असताना पोलिस यंत्रणा काय करत होती? जर प्रसारमाध्यमांना माहिती होते तर मग पोलीस काय करत होते? याची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना करायला सांगितले आहे. जाणीपूर्वक हे वातावरण तयार करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात असले प्रकार कधी घडले नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय आज सर्वोच्च असतो तो निर्णय मान्य केला जाईल अशी आशा होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या सर्वच मंत्र्यांनी हे आंदोलन शमवण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न केला. सातवा वेतन आयोगाची जी रक्कम आहे तिथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पगारासाठी राज्य सरकार हस्तक्षेप करेल असे आश्वासन दिलं असताना निकालानंतर एकीकडे गुलाल उधळून कौतुक करून घेतात आणि नंतर अशा प्रकारचे कृत्य किंवा टोकाचं वागण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि ते कोण आहे हे निश्चितपणे कळलं पाहिजे.
माझा अनुभव बघता पोलीस हे सर्व शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जोपर्यंत पोलिसांचा अहवाल येत नाही तोपर्यंत कोणाचं नाव घेणे योग्य नाही असेही ते म्हणाले. आंदोलन चिरडण्यासाठी राज्य सरकार दोषी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले हा आरोप धादांत खोटा आहे. शरद पवारांनी स्वतः यासाठी नेहरू सेंटरला बैठक घेतली होती. अनिल परब, मी, सदाभाऊ खोत, उदय सामंत होते,आशिष कुमार सिंग होते फक्त कुणाला ती बैठक कळू द्यायची नव्हती. पण, काही दिवसांनी संघटनांचही आंदोलकांनी ऐकणे बंद केले. अनिल परब यांच्याकडे काही संघटनांनी समाधान व्यक्त केले पण काही जणांनी चिथावणीखोर भाषा वापरत लोकांना पेटवून दिले. ही भाषा कुणाला आवडणार नाही आपल्या संस्कृतीत व परंपरेत ती शिकवण नाही.
शरद पवार यांच्या घरावरील माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही यावर बोलताना ते म्हणाले माहिती घेण्यात पोलीस कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. आंदोलकांच्या मागे माध्यमांचे कॅमेरे होते माध्यमांच्या प्रतिनिधींना जर या बाबत माहिती होती तर पोलिसांना का नव्हती याची चौकशी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
सध्या लोकांना भावनिक बनवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे
सध्या लोकांना भावनिक बनवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे . हा प्रकार महाराष्ट्राला परवडणारा नाही केवळ शाहू फुले आंबेडकर यांचे नाव भाषणात घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजे असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
एकमेकांचा आदर करणे ही आपली परंपरा आणि शिकवण आहे काम करत असताना काही चुकला असेल तर समजावून सांगितलं पाहिजे असेही ते म्हणाले.