पुणे– ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, न्यायालयाने दीड वर्षांसाठी कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनीच शेतकर्यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा असेही पाटील म्हणाले. पुण्यात पत्राकारांशी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, कृषी कायद्यांना शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला. भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. राजकारणात दुश्मनी कधीच नसावी. मैत्री असायलाच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात जर आम्हाला पक्ष वाढवायचा असेल तर पवार साहेबांवर टीका करावी लागेल. त्याशिवाय आम्ही पश्चिम महाराष्ट्रात वाढूच शकत नाही. पण पवार साहेब भेटल्यानंतर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच. ही आमची संस्कृती असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अपेक्षापूर्ती करणारा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी साेमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी हा अर्थसंकल्प अपेक्षापूर्ती करणारा असल्याचे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, काेराेनाचे पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल अशी उत्सुकता सर्वांना हाेती. वर्षभरात काेराेनामुळे आर्थिक गाडे रुळावरुन उतरले हाेते परंतु मागील पाच महिन्यात विक्रमी जीएसटी जमा झाल्याने अर्थव्यवस्था सुरळित हाेण्यास मदत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी शेतकऱ्यांना सुखी व सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पेरणी ते काढणी पर्यंत शेतकऱ्यांना खर्च भागवून 50 टक्के नफा मिळावा ही स्वामीनाथन आयाेगाची शिफारस अंमलबजावणी अर्थसंकल्पात हाेवून शेतकऱ्यांकरिता भरीव तरतूद देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यासारखे पायाभूत सुविधा निर्माण व्हावेत याकरिता 40 हजार काेटींची तरतूद करण्यात आली. मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. 12 काेटी मध्यमवर्गीय लाेक लघुउद्याेगात कार्यरत असून लघुउद्याेग बळकटीकरणाचे काम सरकार करत आहे. पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यातील विकास अनेक वर्षे दुर्लेक्षित हाेता त्याठिकाणी निवडणुका डाेळयासमाेर ठेवून अधिक पैसा देऊन सरकारने गुंतवणुक केली असे म्हणता येणार नाही.
पुण्यात लवकरच मेट्राे धावेल
अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूर मेट्राेसाठी निधी देण्यात आला परंतु पुणे मेट्राेस अधिक निधी दिला नाही याबाबत पाटील म्हणाले, पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचे पाच मार्ग पूर्ण हाेतील. पहिला टप्पायातील एक मार्ग मार्च महिन्यात सुरु होईल. 31 किलाेमीटरचा मेट्राे मार्ग सुरुवातीला कार्यरत करण्यात येणार असून रस्त्यावरील अडीच लाख प्रवासी मेट्राेन प्रवास करतील असे नियाेजन आहे. दुसऱ्या टप्प्यात 70 किलाेमीटर मेट्राेमार्ग कार्यान्वित करुन पाच लाख प्रवासी वाहतुकीचे नियाेजन आहे. मेट्राचे 150 किलाेमीटरचे मार्गाचे काम पूर्ण हाेऊन सर्व मार्ग कार्यरत झाले तर रस्त्यावरील 15 ते 16 लाखांचे प्रवासी मेट्राेन प्रवास करुन रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी हाेईल अशी अपेक्षा आहे.