राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला असतानाच एक दिवस अगोदर त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने त्यांना टोकले आहे. ‘दैनिक सामनाच्या’ आजच्या अग्रलेखात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यावर अण्णा हजारे संतापले आहेत.
आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शिवसेनेला दिला. ते राळेगणसिद्धीत बोलत होते. तसेच आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही अण्णा हजारे म्हणाले.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात “लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!,” असे म्हटले आहे.