वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्वदूर -सर्वजणांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते, परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल. भक्तीसंप्रदायाचा अभ्यास करणारे श्री. र. रा. गोसावी आपल्या पुस्तकात या संप्रदायाच्या काळाबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडतात, भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते असे मानले जाते. तेव्हा ज्ञानदेव पूर्व म्हणजे भक्त पुंडलिकाचा काळ, ज्ञानदेव व नामदेव काळ, भानुदास आणि एकनाथांचा काळ, तुकोबा आणि निळोबा यांचा काळ आणि तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ असे या संप्रदायाचे पाच कालखंड स्थूलमानाने पडतात. साधारणतः याच पद्धतीचा कालखंड श्री. शं. गो. तुळपुळे, श्री.भा.पं. बहिरट व श्री सुंठणकर या सारख्या अभ्यासकांनी मांडला आहे, म्हणूनच हा कालखंड आज सर्वमान्य होताना दिसत आहे.
पंढरीला येणारा तो वारकरी, पण हा वारकरी कोणाला भेटायला येतो? तर तो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीरायाला म्हणजेच पांडुरंगाला- विठ्ठलाला भेटायला येतो. या विठुरायाच्या ओढीने मैलोनमैल चालत येणारे भगवद्भक्त आहेत. हा विठुराया हरी व हर म्हणजेच विष्णू व शिव यांच्या ऐक्याचे प्रतीक मानला जातो. निरनिराळ्या संतांनी आपल्या अभंगातून यापद्धतीचा संदर्भ दिला आहे.
संत नामदेव महाराज, विष्णूशी भजीला शिव दुराविला I अधःपात झाला तया नरा ll नामा म्हणे शिव विष्णू मूर्ती एक I देवाचा विवेक आत्मारामू ॥ अशी हरिहरैक्यभावना व्यक्त करतात तर *हरी हरा भेद I नाही करू नये वाद Il द्वैत मानणाऱ्यांना संत तुकाराम महाराज असा उपदेश करताना दिसतात.
वारकरी पंथातील भगवद्भक्त नित्य एकादशी करून हरीची उपासना करतात तर महाशिवरात्रीचा उपवास धरून हर म्हणजेच शिवालाही भजताना दिसून येतात, म्हणजेच निदान वारकरी तरी हा भेद मानत नाहीत असे दिसून येते.
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र. ७५८८२१६५