Vishal Aggarwal remanded in police custody till May 24

#’हीट अँड रन’ प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द : ५ जूनपर्यंत बाल सुधार गृहात रवानगी

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—पुण्यातील कल्याणीनगर भागातील शनिवारच्या (दि. १९ मे) ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्याला चौदा दिवस (५ जूनपर्यंत) बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिले आहेत. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.

दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. मंडळाच्या प्रधान न्यायाधीश एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला. त्याचवेळी आरोपीला सज्ञान घोषित करून खटला चालवावा यासंदर्भातील युक्तिवादही सरकारी वकिलांकडून करण्यात आला. मात्र याचा निर्णय घ्यायला किमान १ महिना ते ३ महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे बाल न्याय मंडळाने सुनावणी अखेर स्पष्ट केले.

सज्ञान घोषित करायचे की नाही हे ठरविण्यासाठी १ महिना ते ३ महिने लागू शकतात

जुवेनाईल जस्टीस अॅक्ट (मुलांचे संगोपन व संरक्षण) कलम १४ आणि १५ नुसार आरोपीला सज्ञान घोषित करायचे की नाही हे ठरविण्यासाठी १ महिना ते ३ महिने लागू शकतात. या दोन कलमात पोलिसांच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी बाल न्याय मंडळाकडे आहे. त्या आधी पोलिसांना अपघाताचा तपास पूर्ण करून एक महिन्यात आरोपपत्र दाखल करावे लागणार आहे. तसेच बाल सुधारगृहाच्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट लागणार आहे. त्याचबरोबर शासकीय मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकाचा अहवाल देखील लागणार आहे. या चार गोष्टींची पूर्तता करून अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करायचे का नाही याचा निर्णय बाल न्याय मंडळ निर्णय घेईल, असे आजच्या सुनावणीत बाल न्याय मंडळाने स्पष्ट केले.

दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या १५ तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती.  त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.

बुधवारी पुणे पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला दुपारी १२ वाजता बाल हक्क न्यायालयासमोर हजर केले.  त्यावेळी युक्तीवाद करत असताना पोलिसांनी मुलगा दारु प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं ४८ हजार रुपयांचे बीलही न्यायालयासमोर सादर केलं. तर तिकडे बचावपक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायलायनं आदेश दिला. हा मुलगा अल्पवयीन असल्याचं आरोपीच्या वतीने युक्तीवाद केला. तर या आरोपीने केलेलं कृत्य हे अत्यंत भीषण असं आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आली. सुमारे आठ तास सुनावणी सुरू होती.

पोलिसांनी नव्या कलमाची केली वाढ

पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने न्यायालयात हजेरी लावली आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर १८५  कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. या मुलाला दुपारी १२  वाजता बाल हक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *