‘सेवा तरंग’ परिषदेत उलगडला सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचा प्रवास

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–संघकार्याच्या माध्यमातून समोर आलेले वंचित समाजातील नागरिकांच्या आयुष्यातील विदारक अनुभव आणि त्यातून सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी उभारलेले कार्य तसेच नातू आजारी पडल्याने रसायन युक्त अन्न पदार्थांच्या दुष्परिणामांची झालेली जाणीव आणि बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणाच्या बियाणांच्या बँकेच्या माध्यमातून घेतलेला घराघरात विषमुक्त अन्न पोहचवण्याचा ध्यास …आपल्या कार्याद्वारे समाजात एक सकारात्मक बदल घडविणाऱ्या या दोन्ही पद्मश्री विजेत्या व्यक्तींच्या कार्याचा प्रवास राज्यातील स्वयंसेवी संस्थांपुढे उलगडला.

सेवावर्धिनी या सेवाभावी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत पुण्यात ‘सेवा तरंग’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय स्वयंसेवी संस्था परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवावर्धिनी, मुकुल माधव फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही परिषद वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे संपन्न होत असून, परिषदेत शनिवारी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. विनिता तेलंग यांनी ही मुलाखत घेतली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी, सेवावर्धिनी’चे कार्याध्यक्ष किशोर देसाई, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुधीर मेहता, सेवावर्धिनी’चे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, सेवावर्धिनी चे सहकार्यवाह माणिक दामले, संस्थेचे जयराज फणसाळकर, पद्मा कुबेर उपस्थित होते.

कार्यक्रमात तुळजापूर येथील यमगरवाडी आणि पिंपरी-चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली याबाबत बोलताना प्रभुणे म्हणाले, ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तुळजापूर येथील एका गावात काम करता असताना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांच्या जीवनातील अनेक हृदयद्रावक घटना माझ्यासमोर घडल्या.  पारधी समजातील तरुणांना केवळ त्यांच्या जातीमुळे कोणतेही कारण नसताना पोलीस उचलून घेऊन जातात आणि त्यांना गोळ्या घालून ठार करतात, या समाजातील स्त्रियांवर होणारे अत्याचार, मुलांचे होणारे हाल पाहून त्यांच्यासाठी काहीतरी काम केले पाहिजे असे वाटले. त्यातून यमगरवाडी येथे पारधी समाजातील मुलांसाठी वसतिगृह व्यवस्था उभी राहिली. आधी समस्या कळली, त्यासाठी पाऊले उचलली आणि तो प्रवास पुढे सुरू राहिला.”

लहान मुलांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्यामधील परंपरागत कौशल्य देखील विकसित झाले पाहिजे, त्यांना व्यवहारिक शिक्षण मिळावे, याच विचारातून पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’चे काम उभे राहिले. आज त्या ठिकाणी आयुर्वेद, वनौषधी, मधुबनी, लाकुडकाम, मातीकाम, ओतकाम, लोकर कातणे या पिढीजात कलांच्या शिक्षणासोबतच रामायण, महाभारत, संत तुकाराम गाथा, दासबोध असे एकंदर २६ विषय शिकविले जातात. पारंपारिक कला-कौशल्ये आणि आधुनिक शास्त्राचे ज्ञान या दोन्हींचे शिक्षण गुरुकुलमध्ये अगदी मोफत स्वरूपात दिले जाते, असेही प्रभुणे यांनी यावेळी सांगितले.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, ” माझ्या मोठ्या नातवाच्या आजारपणामुळे मला रसायनयुक्त अन्नधान्याचे दुष्परिणाम जाणवले. त्यानंतर मात्र मी देशी बिया आणि रसायन मुक्त अन्न यांचाच वापर करायचे ठरवले. लहानपणापासून शेतीचे ज्ञान होतेच, त्यातून देशी बियांच्या वाणांची साठवणूक करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता तिचे रूपांतर देशी बियांच्या बँकेमध्ये झाले. माझ्या घरातच नव्हे, तर आसपासच्या गावातही लोक आता देशी, नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या अन्नधान्यांचा वापर करत असल्याचे पाहून मनापासून आनंद होत आहे. अनेक संस्था, लोक माझ्या कामाची दखल घेतात. मी कधी शाळेची पायरी नाही चढली, पण आज रोज एका महाविद्यालयात जावे लागते. परंतु मला ते आवडते. “

भारतातील प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीच्या ताटात विषमुक्त अन्न यावे, हीच माझी इच्छा असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललो आहोत. नैसर्गिक वस्तूंना गावठी म्हणून बाजूला टाकले जाते. मात्र, तसे न करता, प्रत्येक व्यक्ती ही आपल्या मातीशी जोडली गेली पाहिजे आणि अधिकाधिक स्थानिक बियाणांचे संवर्धन व्हावे, अशी इच्छा राहीबाई यांनी यावेळी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *