India should be called 'India'

भारताला ‘भारत’च म्हटले पाहिजे- डॉ. मनमोहन वैद्य

पुणे-मुंबई राष्ट्रीय
Spread the love

पुणे–जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत, भारत या नावाला एक महत्व आहे, ते प्राचीन काळापासूनचे प्रचलित नाव आहे आणि त्या नावाला सांस्कृतिक मूल्य आहे. त्यामुळे भारताला ‘भारत’च म्हटले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य (Dr. Manmohan Vaidya) यांनी स्पष्ट केले. तसेच मकर संक्रातीनंतर चांगल्या तीथीवरील मुहुर्तावर श्रीराम मंदीरात प्रतिष्ठापना केली जाईल असेही त्यांनी नमूद केले. (India should be called ‘India’)

पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीविषयी संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य आणि प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या भारत आणि इंडीया या दोन नावावर सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यासंदर्भात विचारले असता डॉ. वैद्य यांनी संघाची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘ जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक महत्त्व आहे, ते नाव प्राचीन असून सभ्यता, चिंतन याच्याशी जुळते. या नावासाठी आम्ही पहील्यापासून आग्रही राहीलो आहोत.’’

राम मंदीराच्या उद्घाटना संदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘‘ मंदीराचे बांधकाम पुर्ण झाले असुन, मंकर संक्रांतीनंतरच्या चांगल्या तीथीवरील मुहुर्तावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे.’’ सनातन धर्मावर केल्या जाणाऱ्या टिकेलाही त्यांनी उत्तर दिले. ‘‘कोणताही शब्दप्रयोग करताना, त्या शब्दाचा अर्थ माहीती असणे गरजेचे आहे. सनातन या शब्दाचा अर्थ माहीती नसलेले सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करीत आहे. भारताची ओळख ही अनादी काळापासून अध्यात्मिक अशी आहे. त्यामुळे अनेक राजवटी आल्या तरी ही ते टिकून राहीले आहे. सनातन विषयावरून सुरू असलेली टीका आणि चर्चा केवळ राजकारण आहे’’ असे त्यांनी नमूद केले.

एस. सी., एस. टी. समाजाला दुर्दैवाने दुर ठेवण्यात आले. त्यांना संविधानाने दिलेले आरक्षण मिळाले पाहिजे.  असे स्पष्ट करतानाच इतर समाजांना आरक्षण देण्याचा विषय राजकीय आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली नाही असे त्यांनी सांगितले.

समान नागरी कायद्याबाबत चार पाच मुद्दे घेऊन सहमती नाही. त्यावर चर्चा होऊन सर्वसहमती मिळाली की समाज पुढे जाऊ शकेल असेही ते म्हणाले.

मणिपूरची स्थिती चिंताजनक आहे. मणिपूर मधील हिंसाचार कुकी आणि मैतेई अशा दोन समुदायाशी निगडित आहे. तिथे संघर्ष थांबून शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघाकडून प्रयत्न सुरू आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळते दोन्ही गटांसाठी मदत सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारची वाटचाल योग्य दिशेने

केंद्र सरकारच्या कामकाजाबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कशापद्धतीने मुल्यमापन करीत आहे असे विचारल्यानंतर डॉ. वैद्य यांनी योग्य दिशेने वाटचाल सुरु असल्याचे नमूद करीत इंग्लडमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘संडे गार्डीयन’ या साप्ताहिकाचा  उल्लेख केला. या साप्ताहीकाने २०१४ साली भाजप सत्तेवर आल्यानंतर अग्रलेखात खऱ्या अर्थाने भारताची ब्रिटीश राजवटीची ओळख संपली असल्याचा उल्लेख होता. गेल्या नऊ वर्षात आपण आपल्याला अनुकुल गोष्टी करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. २०१४ नंतर भारत आपल्या सांस्कृतिक ओळखीसह उभा राहतो आहे असे डॉ. वैद्य यांनी नमूद केले. 

संघकार्याचा विस्तार

डॉ. वैद्य म्हणाले की, संघाच्या कार्याला देशभरातून मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. संघाच्या शाखांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि आज ती संख्या कोरोनापूर्वी होती त्यापेक्षा अधिक आहे. २०२० मध्ये देशात ३८ हजार ९१३ स्थानी शाखा होत्या. २०२३ मध्ये ही संख्या ४२ हजार ६१३ झाली आहे, म्हणजेच ९.५ टक्के वाढ झाली आहे. संघाच्या दैनंदिन शाखांची संख्या ६२ हजार ४९१ वरून ६८ हजार ६५१ झाली आहे. देशात संघाच्या एकूण ६८ हजार ६५१ दैनंदिन शाखा असून त्यापैकी विद्यार्थी शाखांचे प्रमाण ६० टक्के आहे. चाळीस वर्षापर्यंतचे तरुण येणाऱ्या शाखांचे प्रमाण ३० टक्के आहे, तर चाळीस वर्षांवरील स्वयंसेवक येणाऱ्या शाखांचे प्रमाण १० टक्के आहे. संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर दरवर्षी एक ते सव्वा लाख जण संघात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यापैकी बहुतांश २० ते ३५ वयोगटातील आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या राष्ट्रीय बैठकीला संघाशी संलग्न ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांत ३० महिला देखील होत्या. राष्ट्रीय स्वंयसेवक संघात पुढील काळात महीलांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, आर्थिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महीलांचे संमलेन आयोजित केले जात आहे. आजपर्यंत झालेल्या साठहून अधिक संमेलनात एक लाखाहून अधिक महीला सहभागी झाल्या आहेत. पुढील काळात आणखी ४११ संमेलन आयोजित केली जाणार आहेत.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या दैनिक, साप्ताहीक, मासिक भरणाऱ्या शाखांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत वाढ झाल्याचे डॉ. वैद्य यांनी नमूद करताना, आकडेवारी सादर केली. पुढील काळात संघाच्या कार्यात नव्याने सहभागी होणाऱ्यांना संघाची विचारसारणी समजुन सांगितली जाणार आहे. समविचारी असणाऱ्या विविध क्षेत्रातील नागरीकांशी संवाद साधून त्यांच्याबरोबर इश्युबेस चर्चा करून मार्ग काढले जाणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *