Vishal Aggarwal remanded in police custody till May 24

#’हीट अँड रन’ प्रकरण : विशाल अग्रवालला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी (दि.१९ मे) मध्यरात्री बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान विशाल अग्रवाल याच्यावर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले.

शनिवारी १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून पोर्श या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया हे जोडपे जागीच मृत पावले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी दिल्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. त्यांना बुधवारी पुणे सत्र न्यायालयात कडोकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. या सुनावणीत न्यायालयाने विशाल अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारी पक्षाकडून विशाल अगरवाल याच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अगरवाल याने अपघानंतर कोणाकोणाला फोन केले? त्याचे छत्रपती संभाजीनगरला जाण्याचे कारण काय? त्याला तिथे कुणाला भेटायचे होते? विशाल अगरवाल यांनी त्यांच्या मुलाला विना नंबर प्लेट गाडी चालवायला का दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाचा खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी सरकारी पक्षाने पुणे सत्र न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने अगरवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

वडिलांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही

ज्या कारणांमुळे अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी जामीन मागितला ती कोणतीही कारणं लक्षात घेऊ शकत नाही असं न्यायालयाने सुनावनी दरम्यान म्हटले आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने वडिलांची त्यांची भूमिका पार पाडली नाही. गाडीचं रजिस्ट्रेशन नाही, नंबर प्लेट नाही आणि मुलाकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याला गाडी चालवायला दिली. वयाची १८ वर्षे पूर्ण नसतानाही त्याला पबमध्ये दारू प्यायला पाठवलं. ज्युएनाईल अॅक्टनुसार हा गुन्हा आहे. त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली, मुलावर नियंत्रण ठेवलं नाही. त्यामुळे हा अपघात झाला आणि दोघांना जीव गमवावा लागला असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

दरम्यान, या केसमध्ये दोन एफआयआर असणे ही चूक आहे. इतर कलमं लावली असली तरी दारूबंदी कायद्याचं एकही कलम लावलं नाही. दारूबंदी कायद्यानुसार वेगवेगळे परमिट देण्यात येतात. त्यानुसार कुणाला दारू द्यायची हे ठरलेलं असतं. या सगळ्या गोष्टींचे रजिस्ट्रेशन व्हायला हवं. पण अल्पवयीन मुलाला दारू देण्यात आली आणि नंतर हा अपघात घडला. दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसताना पोलिसांनी दारूबंदीचे कलम का लावलं नाही? असा सवाल कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे.  

विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक

विशाल अग्रवाल याला न्यायालयात आणल्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या तोंडावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं.  दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. आरोपीला मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे अशी मागणी वंदेमातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.  

“आम्ही या बिल्डरला धडा शिकवायला इथे आलो होतो. परंतु, पोलिसांमुळे तो बचावला. त्याच्यावर हल्ला करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं. आम्ही त्याचा तोंड काळं करायला इथे आलो होतो. कारण त्याच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतले आहेत. त्या मुलांचे आई-वडील आता त्यांच्या लेकरांना पाहू शकणार नाहीत. त्यामुळे या आरोपीचं तोंड काळं करून समाजाला दाखवायचं होतं. तसेच याच्यावर मोक्का या कायद्याअंतर्गत कारवाई करा अशी आमची मागणी आहे. हा बिल्डर कोणत्यातरी छोटा राजन, दाऊद इब्राहिमसारख्या गुंडांच्या टोळीशी संबंधित असला तरी आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. या गुन्ह्याला त्या मुलापेक्षा त्याचा बापच जास्त जबाबदार आहे. त्याने मुलाला कारची चावी देऊन ही हत्या घडवली आहे. वंदे मातरम संघटनेने आज केवळ ट्रेलर दाखवला आहे. जर या आरोपीवर कारवाई झाली नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी वंदेमातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *