पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम करेल असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाखली त्यांनीच न्यायाधीशाची नेमणूक करावी आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली ती चौकशी व्हावी अशी जी त्या कुटुंबाची मागणी आहे ती उत्तरप्रदेश सरकरने मान्य करावी अशी मागणीही त्यांनी केली.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हाथरस मधील स्थानिक पोलीस असतील, डीआयजीचे कार्यालय असेल, एसआयटी असेल हे सर्वजण ही केस दाबण्यामध्ये सहभागी असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.
आंबेडकर म्हणाले, कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यूपूर्व कबुलीजबाब ग्राह्य धरला जावा, अशी तरतूद आहे. आणि या मुलीने मृत्यूपूर्वी आपल्यावर झालेला प्रसंग आणि आरोपींची नावेही सांगितली आहेत. परंतु उत्तर प्रदेश सरकार मात्र तिचा हा कबुलीजबाब मानायला तयार नाही. याउलट हे सरकारच आरोपींच्या नातेवाईकांना भेटताना दिसत आहे. याचाच अर्थ उत्तर प्रदेश सरकार हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तिला न्याय मिळणार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती दिसते.
महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन
महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन असल्याचा आरोप करीत आंबेडकर म्हणाले, असा प्रचार आणि प्रसारही ते करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसं जगायचं आहे, तसं तिला जगता आलं पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशा पद्धतीने असलेली मानसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी मला देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसत आहे.” असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवलं.
हाथरस येथील पिडीतेवरील अन्यायाच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, लॉंग मार्च, नाईट मार्च निघाले. ज्यांना या घटनेमध्ये पुढे यायचे होते ते पुढे आले. विविध संघटनांनी आंदोलने केली.ज्या-ज्या संघटना व्यक्तीना या घटनेचे गांभीर्य वाटत होत त्यांनी सर्व केलं. ज्यांना गांभीर्य वाटत नाही त्यांनी काही केलं नाही असा टोला आंबेडकर यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता लगावला. याबाबत मला कुणाला दोष द्यायचा नाही असेही ते म्हणाले.