गुढीपाडवा : गुढीची काठी, घडा, वस्त्र, साखरेची माळ – कशाची आहेत ही प्रतीके?

महाराष्ट्र लेख
Spread the love

भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतीत निसर्गालाच देव मानले आहे. निसर्गातील गोष्टींची प्रतीकात्मक पूजा करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आता गुढीपाडव्यामधील प्रतीके पाहू.

 पहिले प्रतीक गुढीची काठी विजयाचे प्रतीक आहे . ती जितकी उंच तितकी शुभ मानली जाते . वेदांमध्ये सांगितले आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती प्रक्रिया सुरू केली.  प्राचीन संस्कृत ग्रंथात म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज म्हटले आहे . ब्रम्हा म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे पालन आणि महेश म्हणजे संहार , या सर्व सृष्टीच्या चलनासाठी असणाऱ्या लहरी आहेत.  ब्रम्हांडातील ब्रह्म लहरी किंवा प्रजापती लहरी या दिवशी अधिक प्रमाणात पृथ्वीवर पाठविल्या जातात . तांबे हा धातू ह्या लहरी खेचून घेण्याचे काम करतो.  अधोमुखी तांब्याच्या भांड्यामुळे या लहरी घरात प्रवेश करतात ,अशी मान्यता आहे.

 वसंत ऋतूत व नंतर उन्हाळा बांधू नये म्हणून कडुनिंबाचा वापर केला जातो.  ओवा ,हिंग, मीठ ,मीरे ,गूळ आदि घालून केलेली कडुनिंबाची चटणी पचनक्रिया सुधारते ,पित्ताचा नाश करते त्वचा विकार दूर करते . त्यामुळे कडुनिंब आरोग्याचे प्रतीक म्हणून गुढीला बांधला जातो.  यापुढे उन्हाळ्यात धान्य वाळवून ठेवणे ही प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये देखील कीड लागू नये म्हणून कडुनिंबाची पाने टाकली जातात.

साखरेच्या माळा गोडवा असावा म्हणून लावल्या जातात. भारत कृषीप्रधान, उत्सव प्रिय देश आहे . साखरेच्या माळेने नात्यांमधील गोडवा वाढावा हा उद्देश आहे.

चाफा याच दिवसात बहरतो.  तसेच कोणतेच फुल देवाला वर्ज नाही. परंतु चाफ्याला चीक भरपूर प्रमाणात असतो. देवाच्या मूर्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे सहसा देवाला चाफा वाहत नाहीत. तसेच हे फुल लवकर चुकत नाही. उन्हामुळे गुढीवर फुलांची माळ जास्त काळ टवटवीत राहावी म्हणून चाफ्याची माळ वापरतात.

 एकदा का देवता मानले की नवीन वस्त्र वापरणे आलेच. तसेच विजयाचे प्रतीक म्हणूनही गुढीला वस्त्र वापरले जाते. अशा रीतीने आपल्या दारी मांगल्याचे आणि सृजनतेचे प्रतीक असलेली गुढी उभे राहते.

ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पूर्व क्षितिजावर मेष रास असते, चंद्र सूर्यही असतात .सर्व ग्रह जवळजवळ शून्य अंशात असतात.  सारे मंडलात आपापल्या गतीनुसार फिरतात. परंतु त्यांची शून्य अंशापासून फिरण्याची सुरुवात या दिवसापासून होत. म्हणून हा सुरुवातीचा दिवस विश्व निर्मितीचा दिवस म्हटले तरी हरकत नाही.

 आता आपल्या लक्षात आले असेल गुढीपाडवा हा धार्मिक सण नाही ,तर सृष्टीची सुरुवात आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात एखाद्या विशिष्ट ठिकाणावरून होत. सृष्टी निर्मितीची सुरुवात ह्या दिवसापासून झाली.  म्हणजेच हा सृष्टीचा वाढदिवस आहे. मग ही गोष्ट साऱ्या जीवसृष्टीसाठी लागू होते.  तो एका विशिष्ट परंपरेचा भाग राहत नाही . सारीसृष्टी बहरलेली असते. वसंत ऋतूचे आगमन होते. कोळी पालवी उन्हामध्ये वाऱ्यावर डोलत असते. या नृत्याला कोकिळेचे संगीत असते.  या सर्व सृष्टीच्या सोहळ्याचा आनंद आपण अनुभवायचा असतो.

सारी सृष्टी आपल्याला खुणावते आहे. तेव्हा  आपणही नववर्षाचे स्वागत ताठ कण्याने करावे. म्हणून मेरुदंडाचे प्रतीक काठी, डोक्याचे प्रतीक घडा, विजयाचे प्रतीक वस्त्र,गोडव्याचे प्रतीक माळ तर जीवनातील साऱ्या कडू आठवणी गिळून आरोग्यदायी जीवनाचे प्रतीक कडूनिंब असे साधे उत्तर शोधले तरी गुढीपाडवा आपणास सर्वांना साजरा करता येईल.

अशा सर्व बाजूंनी विचार करून आपण गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करू . आरोग्यदायी जीवनाचा सत्संकल्प करू. उन्हाळा सुकर करण्यासाठी मस्त मलई चक्क्याचे श्रीखंड वेलदोडे वगैरे घालून आरोग्यदायी करून नात्यांमधील गोडवा वाढवू. जमेल तशी ज्ञातेपणाची, भक्तीची, स्वानंदाची, निजधर्माची, मांगल्याची,चैतन्याची गुढी उंच उंच उभारू. विजयाचा झेंडा उंच आभाळी फडकवू .

गीताग्रजा

९४२०४५६९१८

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *