वनयोगी स्व. बाळासाहेब देशपांडे

महाराष्ट्र लेख
Spread the love

‘ओळखीमधून मिळालेली सेवा जास्त काळ टिकत नाही पण सेवेमधून मिळालेली ओळख चिरकाल टिकते.’ याचा प्रत्यय स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्या सेवाकार्यातून येतो. बाळासाहेबांचा स्वर्गवास होऊन २६ वर्षं होऊन गेली पण वनवासी कल्याण आश्रम म्हटलं की सर्वप्रथम बाळासाहेबांचंच नाव समोर येतं. कारण १९५२ साली छत्तीसगडमधील जशपूर येथे बाळासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या शाखा देशभर विस्तारलेल्या आहेत.

२६ डिसेंबर हा रमाकांत केशव देशपांडे उर्फ बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि वनवासी कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस. बाळासाहेबांचा जन्म २६ डिसेंबर १९१३ रोजी अमरावतीमध्ये झाला. बालवयातच त्यांच्यावर देशभक्ती, देशसेवा, हिंदुत्व, प्रामाणिकपणा, कर्तव्याप्ति  निष्ठा इ. संस्कार झाले. एखाद्या वृक्षाला घातलेले खत-पाणी पुन्हा बाहेर काढता येत नाही उलट, त्या खतपाण्यानेच तो वृक्ष बहरतो तसेच बालवयात झालेल्या या संस्कारांमुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व फुलून आले. पदवीनंतर त्यांनी वकिलीची पदवी प्राप्त केली.

स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारत जवळजवळ भारतापासून दुरावला होता. या प्रांतांमधील तसेच सर्वच प्रांतांमधील आदिवासी-वनवासी लोकांचे जीवन सर्वस्वी जंगलांवर अवलंबून होते. पण ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यांमुळे त्यांचे जंगलांवरील अधिकार हिरावून घेतले गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शिक्षण, आरोग्य या तर खूपच लांबच्या गोष्टी.

समर्थ रामदासांनी केलेळे  वर्णन या वनवासींना तंतोतंत लागू पडते.

‘माणसा खावया धान्य नाही । अंथरूण पांघरूण ते ही नाही ।

घर कराया सामग्री नाही । काय करिती ।।

ही परिस्थिती बाळासाहेबांच्या लक्षात आली. ठक्कर बाप्पा आणि गांधीजींच्या मार्गदर्शनाने आणि पूज्य गोळवलकर गुरूजींच्या प्रेरणेने त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. यामध्ये त्यांना जशपूरचे महाराज विजयभूषण आणि मोरूभाऊ केतकरांचे सहकार्य लाभले.

आदिवासी कल्याण खात्यामार्फत जशपूर क्षेत्रात शासनाच्या विकास योजना राबवण्याचे ठरले. त्यासाठी जशपूरचे क्षेत्रीय संघटक म्हणून बाळासाहेबांची नियुक्ती करण्यात आली. जशपूर येथे अवघ्या दोन विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी पहिली शाळा आणि वसतिगृह सुरू केले. एक वर्षात त्यांनी आसपासचे आदिवासी पाडे, गावे यामध्ये १०० शाळा सुरू केल्या.

हळूहळू कामाचा विस्तार वाढत गेला. अनेक वसतिगृह, आश्रमशाळा या आदिवासी समाजाची शक्ती केंद्रं बनली. पुढे काही शासकीय बंधनांमुळे बाळासाहेबांनी शासकीय नोकरी सोडली आणि स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यांनी वनवासींमध्ये राष्ट्रीय प्रेरणा रूजवली.

पुढे ओरिसा, मध्यप्रदेश, बिहार यासारख्या विविध प्रांतात वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाचा विस्तार झाला. त्यातूनच पुढे १९७८ साली या कामाला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. १३ हजार  हून अधिक ठिकाणी १९ हजार प्रकल्प उभे राहिले. आश्रमशाळा, छात्रावास, संस्कार केंद्र इत्यादी स्वरुपाचे ४ हजार ५६२ शैक्षणिक प्रकल्प, ४ हजार ०१५  आरोग्य विषयक प्रकल्प, २ हजार ९३८   आर्थिक विकास प्रकल्प, २ हजार ३१७ खेलकूद प्रकल्प, ५ हजार १७० सत्संग केंद्र, १३ हजार १५१ ग्राम समित्या इत्यादी एकूण निरनिराळ्या १४ आयामांमधून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य चालू आहे.  हे सर्व निश्चितपणे बाळासाहेबांच्या तपस्येचे फळ आहे.  

जनजाती समाज हेच बाळासाहेबांचे कुटूंब होते. या लोकांचा सर्वांगीन  विकास करून त्यांना आत्मनिर्भर, स्वावलंबी बनविणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच ध्येय त्यांनी कायम नजरेसमोर ठेवले होते. अर्थातच हे काम उभं करताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. पण ते डगमगले नाहीत. वेळप्रसंगी त्यांनी ‘आपल्याला अधिकार आहे का तरच गोळीबार करा’  म्हणून पोलिस अधिक्षकांना खडसावले.

निष्ठावान कार्यकर्त्यांचे संघटन उभे करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कारण स्वामी विवेकानंद म्हणत त्याप्रमाणे, ‘संघटनेशिवाय महान कार्ये उभी राहात नाहीत.’

‘असू आम्ही पत्थर पायातील । मंदिर उभवणे हेच आमुचे शील ।। ‘असे महान विचार असणाऱ्या या महान सेवाव्रतीला २६ डिसेंबर या त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम!!

– शोभा जोशी (9422319962)

(वनवासी कल्याण आश्रम, पुणे महानगराची कार्यकर्ती)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *