साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते: अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा -शरद पवार

कला-संस्कृती महाराष्ट्र राजकारण
Spread the love

उदगीर (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी)- मला एका वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधावयाचे आहे. मला साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल परंतू ते वाचकांपर्यंत पोहोचत नसावे. विशेषत: ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्कीक माहितीधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे.नाहीतर जनमाणसांत त्या चूका मूळ धरू लागतात आणि ठाण मांडून बसतात. अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

उदगीर येथे भरलेल्या 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ते बोलत होते.

कयास आणि कल्पनाविलास करण्यासाठी इतर फिक्शनल साहित्य प्रकार आहेत. अशा प्रवृत्तींच्या लेखकांनी त्यासाठी लेखणी पाजळावी. मराठीत पि.एच.डी. करताना विषय देखील संशोधना योग्य असावा. संदर्भग्रंथांचे संकलन करून प्रबंध केलेले पाहावयास मिळतात. सखोल संशोधनाचा त्यात अभाव आढळतो. विद्यापीठांना विनंती आहे की, पि.एच.डी. साठी विषय देताना तो संशोधनक्षम असावा केवळ संकलनक्षम नसावा याची दक्षता घ्यावी. सखोल संशोधनानंतर निर्माण झालेले साहित्य माहितीचे नवे भांडार ठरू शकते.

माझ्या संग्रही असणाऱ्या पुस्तकांकडे पाहिले असता मला जाणवते की, साहित्यातून काव्य कमी होत चाललंय. गेल्या वर्षी मी नाशिक येथील साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. भेट धावती असली तरी माझी नजर दुकानांच्या कप्प्यांमधल्या पुस्तकांचा वेध घेत होती. पुस्तकांमध्ये मला नव्याने प्रकाशित झालेले काव्यसंग्रह फारसे दिसलेच नाहीत. ग.दि.मा., कुसुमाग्रजांचा  मी चाहता असल्याने ती उणीव मला प्रकर्षाने जाणवली. काव्यसंग्रह असतीलही परंतू प्रमुख प्रकाशन संस्था छापण्यासाठी पुढे येत नसाव्यात. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचं  गणित जुळत नसावं असा माझा तर्क आहे. परंतू एकूणच ग्रंथ प्रकाशनाची व्यावसायिक बाजू फारशी उत्साहवर्धक नसावी. नवतंत्रज्ञान म्हणा, बदललेल्या सवयी म्हणा, परभाषेचे आक्रमण म्हणा, मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल म्हणा, मराठी शिक्षणाकडे कमी होत चाललेला ओढा म्हणा ग्रंथ प्रकाशन संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. हे चित्र निराशाजनक आहे. ते बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. 

साहित्यविश्वासमोर हे आव्हान काही नवे नाही. ११ मे १८७८ रोजी न्या.महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी पहिले ग्रंथकार संमेलन या नावाने साहित्य संमेलन भरवले. त्यावेळी देखील ग्रंथकारांसाठी पुस्तक प्रकाशन जिकीरीचे होते. त्यामुळे हे संमेलन प्रामुख्याने ग्रंथकारांना ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्या माध्यमातून विद्येचा लाभ बहूतांशी समाजास व्हावा ह्या हेतूने भरवले गेले. त्यात दरसाल किमान पाच रूपयांचे ग्रंथ विकत घेणारे सहा हजार वाचक तयार व्हावेत असे आवाहन देखील करण्यात आले होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास त्याकाळी राजाश्रय नव्हता आणि लोकाश्रयाशिवाय नवनवीन साहित्य प्रकाशित होणे जिकीरीचे होते असेही त्यांनी नमूद केले .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *