पुणे- इंडियन प्लंबिंग असोसिएशन तर्फे पुण्यात 1 ते 3 डिसेंबर 2022 दरम्यान डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्स अॅन्ड एक्झिबिशनच्या 28 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची संकल्पना अॅडव्हान्समेंट इन प्लंबिंग फॉर बिल्ट एनव्हायरमेंट ही आहे.या परिषदेला बांधकाम व प्लंबिंग क्षेत्राशी निगडीत 1500 हून अधिक व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिक,वास्तूविशारद,एमईपी सल्लागार,इंटिरियर डिझाईनर्स,प्लंबिंगशी निगडीत उत्पादनांचे निर्माते,प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर्स,प्रकल्प व्यवस्थापक,साईट सुपरवायझर्स यांचा समावेश आहे.
इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमीत सिंग अरोरा म्हणाले की,परिषदेत प्लंबिंग आणि पाणी व्यवस्थापन यावर तांत्रिक सत्रे होतील.ही परिषद प्लंबिंग आणि संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी नवीन उत्पादने, प्रकल्प व तंत्रज्ञानावरील कल्पना आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल.
इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष निलेश गांधी म्हणाले की,पुणे हे शैक्षणिक केंद्र असण्याबरोबर स्टार्टअप्ससाठी उदयोन्मुख केंद्र आहे.त्याशिवाय पाणी व प्लंबिंग तंत्रज्ञानामध्ये अनेक कंपन्या येथे कार्यरत आहेत.म्हणून पुणे हे या परिषदेसाठी सुयोग्य आहे.
ते पुढे म्हणाले की,वॉटर ऑडिट,प्लंबिंग अॅप्लिकेशन्समध्ये बीएमएस व आयओटी,पाण्याच्या स्त्रोतांचे पुर्नवसन,आयओटीमुळे पाणी व्यवस्थापनात होणारे बदल अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.याशिवाय नेट झीरो वॉटर व वेस्ट या संकल्पनेवर देखील सादरीकरण होईल.
या परिषदेमध्ये गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय,निरी,आयसीआयसीआय फाऊंडेशन,विप्रो,बिल अॅन्ड मेलिंडा गेटस फाउंडेशन,लेक मॅन ऑफ इंडिया अॅन्ड रेन मॅन ऑफ बंगळुरू, नवी मुंबई महानगरपालिका आणि प्लंबिंग उद्योगातील तज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करतील.
प्लंबिंग हे एक शास्त्र आहे. इमारतीच्या खर्चापैकी 13 ते 15 टक्के हे प्लंबिंगसाठी गरजेचे असते.प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल या कुठल्याही इमारतीच्या दोन महत्त्वाच्या वाहिन्या असतात.प्लंबिंग केवळ पाणीपुरवठ्यासाठीच नव्हे तर सांडपाणी योग्यरित्या इमारतीतून बाहेर काढण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावते.अलीकडच्या काळात प्लंबिंग क्षेत्रात बरीच प्रगती झाली असून यामुळे पाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत झाले आहे,मात्र या प्रगत व सर्वोत्तम प्लंबिंग पध्दती सर्व बांधकाम उद्योग व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.या परिषदेद्वारे याबाबतची माहिती,नवकल्पना,सर्वोत्तम पध्दती आणि कोडल आधारित पध्दती व्यावसायिकांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करू असे श्री.गुरमीत सिंग अरोरा म्हणाले.
बांधकाम क्षेत्रात झपाट्याने होणारी वाढ,सरकारतर्फे घेण्यात येणारे पुढाकार यामुळे प्लंबिंग इंडस्ट्रीला चालना
झपाट्याने होणारे शहरीकरण,बांधकाम क्षेत्रात होत असलेली वाढ आणि प्रधानमंत्री आवास योजना,अमृत योजना,जलशक्ती अभियान,स्वच्छ भारत मिशन 2.0 यासारखे सरकारी पातळीवर सुरू असलेल्या पुढाकारांनी प्लंबिंग क्षेत्राला जबाबदारीसह मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
गुरमीत सिंग अरोरा म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.या नवीन बांधकाम इमारतींना मेकॅनिकल,इलेक्ट्रीकल आणि प्लंबिंगसह संरचनांच्या सर्व पैलूंचे योग्य नियोजन आणि अमंलबजावणी आवश्यक आहे.शिवाय जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या 18 टक्के आहे,परंतु फक्त 4 टक्के पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे,म्हणूनच पाणी वाचविण्याबरोबरच सांडपाण्याचे व्यवस्थापन,रिसायकलींग आणि याचा योग्य वापर करून पाण्याच्या समस्या कमी करणे महत्त्वाचे आहे.सांडपाण्याचा पुर्नवापर करण्याबाबत पुरेशी माहिती पोहचविणे गरजेचे आहे.नेट झीरो वॉटर अॅन्ड सॅनिटरी वेस्ट या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे.
वास्तूविशारद आणि प्लंबिंग व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे
कुठल्याही प्रकल्पाचे नियोजन व कार्यान्वयन करताना,वास्तूविशारद व प्लंबिंग व्यावसायिक एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. सध्या प्लंबिंग व्यावसायिक एखाद्या प्रकल्पाचा भाग होण्याआधीच बांधकामाची संरचना तयार असते,त्यामुळे योग्य प्लंबिंग यंत्रणा प्रस्थापित करणे काही बाबतीत आव्हानात्मक ठरते.गुरमीत सिंग अरोरा म्हणाले,म्हणूनच बांधकाम व्यावसायिक,वास्तूविशारद,प्रकल्प व्यवस्थापक यांच्यामध्ये,प्लंबिंगच्या महत्त्वाबाबत अधिक जागरूकता निर्माण व्हायला हवी. या परिषदेद्वारे योग्य प्लंबिंग पध्दतींवर जागरूकता निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे.28 व्या इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्समध्ये प्लंबिंग व बांधकाम उद्योगातील तज्ञ या क्षेत्रात होणार्या प्रगतीबाबत मार्गदर्शन करतील.संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी 5 उद्दिष्टे थेट प्लंबिंगशी संबंधित आहेत.स्वच्छ पाणी आणि एकंदर स्वच्छता यासारख्या महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या दिशेने ही परिषद सर्वांसाठी उपयुक्त ठरेल.
नेट झीरो वॉटर आणि नेट झीरो सॅनिटरी वेस्ट चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने दोन सामंजस्य करार
इंडियन प्लंबिंग असोसिएशन तर्फे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टस् (आयआयए) आणि सिंगापूर प्लंबिंग सोसायटी (एसपीएस) बरोबर सामंजस्य करार करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टस्बरोबर होणार्या सामंजस्य कराराअंतर्गत जलसंधारण,कार्यक्षमता आणि सुरक्षित प्लंबिंग,सुरक्षित प्लंबिंग मानकांद्वारे पर्यावरण संरक्षण यासारख्या पाणी व स्वच्छतेशी निगडीत राष्ट्रीय हिताच्या बाबींवर संयुक्तपणे काम केले जाणार असून नेट झीरो वॉटर आणि नेट झीरो सॅनिटरी वेस्टचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे प्रयत्न असतील.सिंगापूर प्लंबिंग सोसायटीसोबत होणार असलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत लो फ्लो फिक्स्चर्स व सॅनिटरी वेअर,रेन वॉटर हार्वेस्टिंग,रिक्लेम ग्रे अॅन्ड ब्लॅक वॉटर याद्वारे पाण्याचा वापर कमी करणे आणि नेट झीरो वॉटर आणि नेट झीरो सॅनिटरी वेस्ट चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हा प्रयत्न असेल.
गुरमीत सिंग अरोरा म्हणाले की, इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या 24 अशा सक्रीय अशा शाखा आहेत आणि भारतात प्लंबिंगची मानके सुधारण्याच्या दृष्टीने सातत्याने काम करत आहे.योग्य प्लंबिंग पध्दतींचा वापर बांधकाम क्षेेत्रात व्हावा,याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक पुढाकार हाती घेतले जातात.त्यामध्ये आयपीए पब्लिकेशन्स,कार्यक्रम व जलसंवर्धनासाठी विविध परिषदा व पुढाकार यांचा समावेश आहे.आयपीएमध्ये भारतभरात 6000 अधिक सक्रीय सदस्य असून यामध्ये बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व श्रेणींमधील व्यावसायिकांचा समावेश आहे.यामध्ये वास्तूविशारद,पीएचई सल्लागार,उत्पादक,कॉन्ट्रॅक्टर्स,व्यापारी व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे.प्लंबेक्स इंडिया,इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल्स लीग,इंडियन प्लंबिंग टुडे,प्लंबिंग कोडस,प्लंबिंग लॅबोरेटरी आणि आय सेव्ह वॉटर मिशन ही या दिशेने ठोस पावले आहेत.