पुण्यातील गणेशोत्सवास कोरोनाच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने प्रारंभ


पुणे– जगप्रसिध्द असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवास कोरोनाच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या गणपती मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना इतर मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष-पदाधिकारी यांच्या शुभहस्ते पार पाडली. गेल्या १२८ वर्षात प्रथमच मानाच्या गणपती मंडळांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना केली.

दरवर्षी ढोल ताशांचा गजर, लक्ष्मी रस्त्यावर गणरायासाठी घातलेल्या आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, लेझीम, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा उत्साहपूर्ण आणि संपूर्ण वातावरण दुमदुमून टाकणाऱ्या भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन होते. मात्र, यंदा १२८ वर्षांच्या या परंपरेत कोरोनाच्या संकटामुळे खंड पडला आणि अत्यंत साधेपणाने श्री गणराया विराजमान झाले.

अधिक वाचा  मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला परवानगी नाही- अजित पवार

मानाचा पहिला श्री. कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या शुभहस्ते पार पडली, तर मानाचा दुसरा श्री. तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते, तसेच श्री. गुरूजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनित बालन यांच्या शुभहस्ते आणि मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना केसरी वाडा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिपक टिळक यांच्या हस्ते पार पडली. तसेच, मानाचा पाचवा गणपती केसरी गणेशोत्सवाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणती रोहित टिळक यांच्या हस्ते झाली.

पुणे शहरातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध असून हा उत्सव पाहण्यास अनेक ठिकाणावरून नागरिक शहरात येत असतात. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून करोना विषाणूमुळे देशभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर या काळात आलेले सर्वच सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले गेले. त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या निर्णयाला पुणे शहरातील सर्व मंडळांनी साथ दिली.

अधिक वाचा  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्ली येथे साजरी होणार

 तसेच, गेल्या १२८ वर्षात प्रथमच मानाच्या गणपती मंडळांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना केली आहे. अत्यंत साधेपणाने पण उत्साहामध्ये परंपरा न मोडता चांदीच्या पालखीतच गजाननाचे आगमन केले आहे. भावना संमिश्र आहे, वाईटही वाटत आहे, पण यंदाचे गणेशोत्सव हा सेवा उत्सव म्हणून साजरा करणार आहोत, अशी भावना देखील श्रीकांत शेटे यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने सांगितल्या प्रमाणेच यंदा आम्ही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहोत. दरवर्षी वाजत गाजत गणरायाचे आगमन करत असतो. पण यंदा मंदिरातून मांडवात गणपती बाप्पाला आणून त्यांचे आगमन केले आहे. खूप वाईट वाटत आहे, पण पुणेकरांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे, अशी भावना मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  शंकर महाराज मठ परिसरात मानपानावरून  गुरुवारी भाजपचे दोन गट भिडले

प्रत्येकाच्या अंगातला उत्साह वाढवणारा हा उत्सव असतो, आणि तोच यावर्षी हरपला आहे, अशी भावना मानाचा चौथा तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी व्यक्त केली आहे. यापुढील काळात विघ्नहर्त सगळीच विघ्न दूर करेल, अशी प्रार्थना गणराया चरणी मानाच्या पाचव्या श्री. केसरी वाडा गणपती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी गणराया चरणी केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love